नवी दिल्लीः भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा आज केली. देशात टप्प्यात मतदान होणार असून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होऊन ४ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीबरोबरच चार राज्यांतील २६ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि नवनिर्वाचित निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे रोजी तिसरा टप्पा, १३ मे रोजी चौथा टप्पा, २० मे रोजी पाचवा टप्पा, २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होईल.
निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक नवीन पावले उचलली आहेत, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सुमारे ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. २६ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्यात ८९ जागांसाठी, ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी, १३ मे रोजीच्या चौथ्या टप्प्यात ९६ जागांसाठी, २० मे रोजीच्या पाचव्या टप्प्यात ४९ जागांसाठी, २५ मे रोजीच्या सहाव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आणि १ जून रोजीच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुती आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत आणखी समावेश झालेला नाही. वंचित जर मविआमध्ये आली तर ही लढत आणखीच रंगतदार होणार आहे.
१९ एप्रिल पहिला टप्पा
महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक मतदारसंघाचा समावेश आहे.
२६ एप्रिल दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा- यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी मतदारसंघाचा समावेश आहे.
७ मे तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा समावेश आहे.
१३ मे चौथा टप्पा
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड आणि अहमदनगर मतदारसंघाचा समावेश आहे.
२० मे पाचवा टप्पा
पाचव्या टप्प्यात २० मे रोजी महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. त्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे. ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.