जिंकण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेवून पराभवाची शक्यता असलेल्या जागा शिवसेना, राष्ट्रवादीला देण्याचा भाजपचा प्लान?


मुंबईः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने दोन दिवसांपूर्वीच १६ राज्यांतील लोकसभेच्या १९५ मतदारसंघांसाठीचे उमेदवार जाहीर केले मात्र त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाराष्ट्रात भाजप- शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा समावेश असलेल्या महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. मित्रपक्षांना कमीत कमी जागा देऊन अधिकाधिक जागा स्वतःकडे ठेवण्याची भाजपची तयारी आहे. त्यातच जिंकण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेवायच्या आणि पराभवाची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांना देऊन त्यांची बोळवण करायची, असा भाजपचा प्लान असल्याची माहिती महायुतीतीलच सूत्रांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही. न्यू इंडियन एक्स्प्रेसने महायुतीतील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त चार जागा सोडण्याच्या तयारीत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ ७ जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांची मागणी केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जिंकल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर निवडून आलेल्या या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदेंसोबत गेले आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंनी ११ जागांची मागणी केलेली असताना त्यांना केवळ ७ जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार असलेल्या अनेक लोकसभा मतदारसंघांवर भाजपने दावा सांगितला आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा केल्यामुळे महायुतीत संघर्ष पेटला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युती असताना कायम शिवसेनेकडे राहिला आहे. या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतील उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहेत, परंतु भाजपच्या नारायण राणे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.

जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत असंतोष असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर न्यू इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, भाजपला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. गेली अनेक वर्षे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जागांवरही भाजपने दावा सांगितला आहे. जिंकायची खात्री असलेल्या जागा भाजपला हव्या आहेत आणि पराभवाची शक्यता असलेल्या जागा ते मित्रपक्षांना देऊ करत आहेत. आपल्या मित्रपक्षांचे लोकसभेतील स्थान कमीत कमी असावे, यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, असे या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

आठ ते दहा दिवसांत तिढा सुटणार?

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महाराष्ट्रातील महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही आमच्या महायुतीतील मित्रपक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा करत आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांचा समावेश नाही. पुढील आठ ते दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा आमचा अंदाज आहे. त्यानंतर संबंधित मित्रपक्षांच्या अधिकृत नेत्यांकडून त्याबाबतची घोषणा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!