छत्रपती संभाजीनगर: शासन निर्णयातील तरतुदीनुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केल्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सन २०२४ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताविस्त केल्यानुसार पैठण येथील संत एकनाथ महाराज कालाष्टमी निमित्त मंगळवार, २ एप्रिल, खुलताबाद येथील जरजरी बक्ष ऊरूसानिमित्त बुधवार, ११ सप्टेंबर आणि नरक चतुर्दशीनिमित्त गुरूवार ३१ ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी असेल. विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांनी या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
या स्थानिक सुट्ट्या राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयांखेरीज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कोषागरे व महामंडळांची कार्यालये यांना लागू राहणार आहेत.