नवी दिल्लीः मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून आज मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना इंग्रजीतून प्रश्न विचारल्यामुळे राणे चांगलेच गडबडले आणि या गोंधळात त्यांनी भलतेच उत्तर देऊन टाकले. संसदेत राणेंची त्रेधातिरपिट उडाल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राज्यसभेतील भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना प्रश्नोत्तराच्या तासात त्यांच्या खात्यासंदर्भात इंग्रजीतून प्रश्न विचारला. एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? असा तो साधा-सोपा प्रश्न होता. पण हा प्रश्न इंग्रजीतून विचारण्यात आल्यामुळे नारायण राणे चांगलेच गडबडले. उत्तर देता देता त्यांची त्रेधा तिरपिट उडाली.
भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नेमका काय प्रश्न विचारलाय? हे सुरूवातीला राणे यांना कळलेच नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी राणे यांनी एमएसएमई क्षेत्रात निर्यात कशी वाढवणार? कारखाने कसे सुरू होणार? याबाबतची माहिती वाचून दाखवण्यास सुरूवात केली. राणे म्हणाले, मी तुम्हाला वाचून दाखवतो. निर्यातीच्या क्षेत्रात एमएसएणईची हिस्सेदारी वाढवण्यासाठी स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत व्यवसायाची सुगमता आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले. तसेच या क्षेत्रातील उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, भाजप खासदार शर्मा यांचा प्रश्नच राणेंना कळला नाही, त्यामुळे गडबडल्याचे पाहून काही खासदारांनी त्यांना पुन्हा एकदा प्रश्न ऐकवला. तर प्रश्न एक आणि उत्तर भलतेच ऐकून काही खासदार गोंधळ घालू लागले. त्यामुळे नारायण राणे खासदारांवर संतापले.
राणे गडबडल्याचे पाहून राज्यभेचे उपाध्यक्ष, पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह हे राणेंच्या मदतीला धावून आले. खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नेमका काय प्रश्न विचारला हे त्यांनी राणेंना हिंदीतून सांगितले. कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत, या प्रश्नाचे उत्तर द्या, असे हरिवंश नारायण सिंह म्हणाले.
सिंह यांनी प्रश्न सांगितल्यानंतर गोंधळ घालत असलेल्या खासदारांना शांत करताना तुम्ही ऐका…तुम्ही ऐकून घ्या… अशी विनंती राणेंनी केली. हा गोंधळ पाहून राणे ‘क्या… काय केलं?’ असेही कुजबुजल्याचे या व्हायरल व्हिडीओत पहायला मिळत आहे.’कारखाने सुरू झाल्यावर आपोआप अडचणी सोडवल्या जातील. कारखानेच सुरू झाले नाहीत तर कामगारांचे प्रश्न सुटतील का?’, असे राणे तावातावानेच बोलत राहिले.
राणेंच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे खासदारही आक्षेप घेत होते. सभागृहातील गोंधल वाढला. त्यामुळे पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांनी नारायण राणेंना सावरले. तुम्ही सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर संबंधित खासदार महोदयांना बोलावून एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने काय पावले उचलली हे तुम्ही त्यांना सांगा, असे सिंह यांनी राणेंना सांगितले.