अवघ्या ८४ सेकंदाच्या ‘अभिजीत मुहुर्ता’त झाली अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, प्रधानमंत्री मोदींनी केले अनुष्ठान!


अयोध्याः  अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिरात आज विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमंग करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अभिजीत मुहूर्ता’वर दुपारी १२ वाजून २९ मिनिटे आणि ३ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटे आणि ३५ सेकंदांपर्यंत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभाग घेतला. ‘अभिजीत मुहूर्त’ केवळ ८४ सेकंदांचाच होता.

राम मंदिराच्या गर्भगृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत पोहोचल्यानंतर अनुष्ठानाला सुरूवात झाली. या अनुष्ठानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्य भूमिका बजावली. आरएसएस प्रमुख मोहन भागवत फक्त हे अनुष्ठान पहात होते. ते मोदींच्या बाजूलाच बसले होते.

अयोध्येतील बाबरी मशीद-राम मंदिर वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराच्या एका भागाचे बांधकाम अजून पूर्ण होणे बाकी आहे.

अयोध्येत २.७ एकर जमिनीवर बांधण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १६१ फूट उंच, २३५ फूट रुंद आणि ३६० फूट लांबीचे हे मंदिर आहे. प्राचीन भारतातील दोन मंदिर बांधकाम शैलीपैकी एक असलेल्या प्रतिष्ठित नागर शैलीमध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे.

राम मंदिराच्या बांधकाम आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व वैदिक अनुष्ठानाचे पालन करण्यात आले आहे. एकूण ५७ हजार वर्गफूट क्षेत्रफळावर विस्तारलेले हे मंदिर तीन मजली आहे. प्रसिद्ध कुतुब मीनरच्या उंचीच्या जवळपास ७० टक्के या मंदिराची उंची आहे.

मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती ५१ इंच उंचीची आहे. भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलांची उंची ५१ इंचच असते. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीची उंची ५१ इंच ठेवण्यात आली आहे. ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!