नामातंर लढा हा सामाजिक समतेच्या विजयाचे प्रतिक, त्यासाठी १७ वर्षे संघर्ष हा चिंतेचा विषयः डॉ. सुधीर गव्हाणे


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रकांडपंडित म्हणून जागतिकस्तरावर गौरवल्या गेलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव  विद्यापीठाला देण्यासाठी विरोध होणे, १७ वर्षे संघर्ष करावा लागणे, हाच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. खरे तर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा सामाजिक समतेच्या विजयाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन नामांतर लढयाचे अभ्यासक आणि  विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३० व्या नामविस्तार दिन आज साजरा करण्यात आला. ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर डॉ.सुधीर गव्हाणे यांचे व्याख्यान झाले.  विद्यापीठाच्या नाटयगृहात आयोजित कार्यक्रमाच्या कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी होते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.गौतम पाटील,  डॉ.योगिता होके पाटील व कुलसचिव दिलीप भरड, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.

ज्यांना शिक्षणाची कसलाही गंध नाही अशा अनेक अडाणी माणसांची नावे शाळा, महाविद्यालयास बिनबोभाटपणे दिली जात होती. त्या काळात ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे नाव विद्यापीठाला देण्यास विरोध झाला, ही दुर्देवाची गोष्ट आहे. तब्बल १७ वर्षे नामांतरासाठी लढा द्यावा लागणे हीच खेदाची बाब आहे. वास्तविक डॉ.आंबेडकर हे सामाजिक स्वातंत्राच्या लढयाचे प्रणेते होते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते, असे डॉ. गव्हाणे म्हणाले.

१९२७ मध्येच सायमन कमिशनच्या वेळीच डॉ.आंबेडकर यांनी विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याबद्दलची मांडणी प्रभावीपणे केली होती. मराठवाड्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यामुळे बहुजन समाजातील अनेक पिढ्या शिकू शकल्या. अशा महामानावाचे नाव मिळणे हा एक प्रकारे विद्यापीठाचा गौरव आहे, असेही डॉ.गव्हाणे म्हणाले.

नामविस्तारांनंतर विद्यापीठाने गेल्या ३० वर्षात मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तनात, सामाजिक घुसळण घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान आहे, असेही डॉ.गव्हाणे म्हणाले. सुमारे एका तासाच्या व्याख्यानात डॉ.गव्हाणे यांनी नामांतर लढयाचे विविध पैलू मांडले.

सामजिक नैतिकता, मूल्यांचे जतन व्हावे-कुलगुरु

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सामजिक नैतिकता, मूल्यांचे जतन केले पाहिजे. त्या काळात मराठवाडयासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेच्या वेळी बोलून दाखविली. त्यांचे नाव मिळाले त्यामुळे खरेतर विद्यापीठाचाच गौरव झाला आहे, असे कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले.

विद्यापीठाच्या नामविस्तरानंतर विद्यापीठ गेट हे लाखो अनुयायाचं श्रद्धास्थान बनले आहे. राज्यातील लाखो लोक आज विद्यापीठ गेट वर येतात. मनोभावे नतमस्तक होतात. गेल्या तीस वर्षात विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. नामविस्तारावेळी असलेली विभागांची संख्या ३० वरुन आज ४५ पर्यंत पोहोचली आहे. नामविस्तारच्या वेळी अनुदान प्राप्त झालेल्या केमिकल टेकनॉलॉजी आणि संगणकशास्त्र विभागाने मोठी प्रगती केली असल्याचे डॉ. गोसावी म्हणाले.

विद्यापीठातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी संशोधन छात्रवृत्ती प्राप्त केली असून दर महिन्याला सुमार सात कोटी रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत आहे, अशा प्रकारे विद्यापीठाने प्रगतीच्या दिशेने ‘टेक ऑफ’ घेतला आहे.  पहिल्या पिढीचे पदवीधर अर्थात फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट्स घडवणारे महामानवाच्या नावाने ओळखले जाणारे आपले विद्यापीठ आहे. प्रबोधनाचा वसा आणि वारसा आपण सर्वांनी मिळून नेटाने पुढे नेला पाहिजे, असेही डॉ. गोसावी म्हणाले.

डॉ.कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविकांत नामांतर लढयाचा इतिहास मांडला. डॉ.संजय शिंदे यांनी प्रास्ताविक तर सुवर्णपदकांचे वाचन डॉ.विष्णु कऱ्हाळे यांनी केले. प्रा.प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.संजय शिंदे यांनी आभार मानले. मुद्रण विभागाने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

सुवर्णपदकांचे वितरण

नामविस्तार दिन सोहळयात कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते मार्च-एप्रिल २०२३ या परीक्षेतील सुवर्णपदक प्राप्त ९ जणांना पदक प्रदान करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी, अभ्यासक्रम व सुवर्णपदकाचे नाव पुढीलप्रमाणे: मेघा राजेंद्र अंगरखे (एमए इंग्रजी, प्राचार्य एस.टी.प्रधान सुवर्णपदक), यास्मिन फिरदोस असिफोद्दीन (एमए ऊर्दू- कुलपतींचे सुवर्णपदक), सौज्ञा रामभाऊ कव्हळे (बी.ए. लोकप्रशासन) व काळे कल्पना गिण्यान (एम.ए.लोकप्रशासन) तसेच कोमल बंडू आरे (एम.ए.राज्यशास्त्र) या तीनही गुणवंतांना डॉ.रमेश ढोबळे सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

शेख उजमा आरा बद्रुद्दीदीन (एम.ए इंग्रजी, डॉ.बापुजी साळुंके सुवर्णपदक), चंद्रमणी शंकरराव वाकळे (बी.जे, मा.राजेंद्र दर्डा प्रायोजित दैनिक लोकमत सुवर्णपदक), निकिता सुनील हारके (एम.एस्सी जीवरसायनशास्त्र- प्रा.एस.एस.पवार सुवर्णपदक),  नेहा श्रीकांत कुलकर्णी (एम.कॉम- डॉ.एन.जी.बापट सुवर्णपदक) आदी नऊ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरित करण्यात आले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!