नाशिकच्या रोड शोमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा राजकीय प्रचार, उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘मागचे स्थान’!


नाशिक: राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत रोड शो केला. या रोड शोमधून प्रधानमंत्री मोदींनी महाराष्ट्रातील राजकीय प्रचाराचा नारळ फोडला. एरवी रोड शोमध्ये एकटेच झळकणाऱ्या मोदींनी नाशिकच्या या रोड शोमध्ये मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनाही सोबत घेतले खरे, परंतु मोदींनी या रोड शोमध्ये आपल्या उजव्या बाजूला शिंदे, डाव्या बाजूला फडणवीसांना उभे केले तर अन्य एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागचे स्थान देत पाठीशी उभे केले. त्यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

 प्रधानमंत्री मोदी यांचे आज सकाळी निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून मोदी यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यावेळी त्यांच्यासमवेत होते.

 या रोड शोमध्ये मोदींसाठी सजवलेल्या वाहनात मोदींच्या उजव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीमागच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते.  त्यामुळे संपूर्ण रोड शो संपेपर्यंत अजित पवार टीव्हीच्या कॅमेऱ्यात अभावनेच दिसले. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातही त्यांना कैद करणे अवघड होऊन बसले. परिणामी अजित पवार या रोड शोमध्ये असूनही नसल्यासारखेच होते.

अनेकदा अजित पवार हे भाजपसोबतच्या कार्यक्रमांना हजर रहात नसल्याची चर्चा होते. परंतु आज प्रधानमंत्री मोदींच्या नाशिक दौऱ्यात ते उपस्थित होते. मात्र या दौऱ्यात मोदींनी काढलेल्या रोड शोमध्ये अजित पवारांना मागचे स्थान दिले. ते माध्यमांच्या झोतात येणार नाहीत, याची काळजी घेऊनच त्यांना या वाहनात उभे केले होते की काय? अशी शंका घेत याबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 या रोड शोच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन लढवणार आणि या सोबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र मागचे स्थान दिले जाणार असल्याचा राजकीय संदेशच दिल्याचे मानण्यात येत आहे.

 प्रधानमंत्री मोदी यांनी केलेला हा रोड शो आणि काळाराम मंदिरात जाऊन घेतलेल्या दर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे.

या रोड शोमध्ये लेझिम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत करत होती. प्रधानमंत्री मोदी यांना जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. लेझिम पथक, ढोल पथक आणि विविध वेशभूषेतील युवक युवतींनी सारा परिसर जणू चैतन्याने भरून गेला होता.

हॉटेल मिर्ची ते तपोवन पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर हातात तिरंगा घेऊन आणि भगवे झेंडे हाती घेत युवकांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांचा समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!