राज्यपालांनी घेतल्या ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारांच्या मुलाखती, आता कोणाच्या गळ्यात कुलगुरूपदाचा ‘फुलहार’ पडणार? याचीच प्रतीक्षा


मुंबईः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने निवडलेल्या ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया राज्यपाल तथा महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी गुरूवारी पूर्ण केली. आता राज्यपाल कोणाच्या गळ्यात कुलगुरूपदाचा ‘फुलहार’ घालणार? याकडे उच्च शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

डॉ. प्र. गो. येवले यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती. या शोध समितीने कुलगुरूपदासाठी आलेल्या अर्जांतून २४ जणांची नावे शॉर्टलिस्ट करून २८नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि या मुलाखतीतून ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारांच्या नावांची शिफारस राज्यपाल तथा कुलपतींकडे केली.

या ‘टॉप फाइव्ह’मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय दागा ढोले,याच विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक डॉ. विलास शेषराव खरात, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विजय जनार्दन फुलारी, व जैवतंत्रज्ञान विषयाच्या प्राध्यापक डॉ. ज्योती  प्रफुल्ल जाधव आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र बळीराम काकडे यांचा समावेश आहे.

राज्यपाल तथा कुलपतींनी १९ डिसेंबर २०२३ रोजी या टॉप फाइव्ह उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. परंतु काही कारणास्तव या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलाखतींसाठी ४ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना राजभवनात गुरुवारी दुपारी ३ वाजताचा रिपोर्टिंग टाइम देण्यात आला. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मुलाखतींना सुरूवात झाली. राज्यपाल तथा कुलपतींनी या ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारांना विद्यापीठ विकासाचे त्यांचे व्हिजन मांडण्यासाठी प्रत्येकी ८ ते १० मिनिटे वेळ दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारंपैकी सर्वाधिक काळ मुलाखत डॉ. विजय फुलारी यांची चालली.

मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल आणि आजही राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी कुलगुरूपदी निवडलेल्या नावाची घोषणा केली नाही. येत्या एक-दोन दिवसांत ही निवड जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यपाल तथा कुलपती आता कुलगुरूपदाचा ‘फुलहार’ नेमका कोणाच्या गळ्यात टाकणार? याबाबत उच्च शिक्षण क्षेत्राला उत्सुकता लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!