आयटीआयच्या उमेदवारांना खुश खबर! महावितरणच्या नोकर भरतीमध्ये वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश


मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नोकर भरतीमध्ये विद्युत सहायक या पदासाठीच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या वीजतंत्री आणि तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयटीआयचा हा ट्रेड केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरिता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबवण्यात येतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचा समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतामध्ये करण्यात आला आहे. नोकर भरतीमध्ये या अभ्यासक्रमांचा समावेश केल्यामुळे राज्यातील विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या, पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या दोन वर्षे कालावधीच्या वीजतंत्री (Electrician) आणि तारतंत्री (Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक ०६/२०२३ च्या विद्युत सहाय्यक या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेमध्ये करण्यात आली आहे.

विविध उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मंडळ सुसज्ज आहे. मंडळाच्या अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे आभारी आहोत. राज्यातील सर्व विभागांनी देखील त्यांच्या पदभरतीमध्ये मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश करावा, असे आवाहन लोढा यांनी सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील विभागांना केले आहे.

मंडळाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश केल्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नवीन कौशल्य, रिस्किलिंग, अपस्किलिंग आणि रोजगार याद्वारे कौशल्य परिसंस्थेचा सर्वांगीण विकास होईल आणि उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

मंडळास नुकतेच राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परिषद, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांची  अवॉर्डिंग बॉडी आणि असेसमेंट बॉडी अशी दुहेरी संलग्नता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमांना नॅशनल स्किल्स क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) दर्जाप्राप्त करुन घेणे व त्याप्रमाणे एनएसक्यूएफ प्रमाणपत्र निर्गमित करणे शक्य होईल.

मंडळाचे प्रमाणपत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त होतील. याव्दारे क्रेडिट ट्रान्सफर, उच्च शिक्षणाच्या संधी, राष्ट्रीय पातळीवर अभ्यासक्रमांना मान्यता, शिकाऊ प्रशिक्षण उमेदवारी योजनेचे लाभ घेणे शक्य होईल. पर्यायाने मंडळाव्दारे युवकांना दर्जेदार प्रशिक्षण व रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे सुलभ होईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *