नागपूर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहोत. परंतु भाजपची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक आहेत. त्यांनी मनात आणले असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देता आले असते,असा आरोप भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय-२०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना फडणवीसांनी हे आरोप केले.
सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता. अगदी महाविकास आघाडीचे सरकार असताना सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय राज्यात दुसरे प्रश्न नाहीत का? असे म्हणत हा विषय उडवून लावला होता. त्यांना (शरद पवारांना) वारंवार संधी मिळूनही त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, असे फडणवीस म्हणाले.
त्यांच्या मनात असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. त्यांच्या मनात असते तर सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे येण्याआधीही मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकले असते. परंतु त्यांच्या मनात कधीचआरक्षण द्यायचे नव्हते,असा आरोपही फडणवीसांनी केला.
शरद पवारांना विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर आपले नेतेपद कायम राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे शरद पवारांनी लोकांना सतत झुंजवत ठेवण्याचे काम केले, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपची कमिटमेंट ओबीसी समाजाशीच
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपण करणार आहोत. पण त्याचवेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. भाजपची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. ओबीसी आरक्षणावर कुठल्याही परिस्थितीत संकट येऊ देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
निवडणुकीत काय होईल याची चिंता नको
मराठा आणि ओबीसी समाज आपल्यासाठी केवळ व्होटबँक नाहीत. मुळात आरक्षणाच्या मुद्द्याचा निवडणुकीवर फारसा परिणाम पडत नाही. हे समाजाचे प्रश्न आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय होणार याची चिंता भाजप कार्यकर्त्यांनी करू नये. चिंता करायचीच असेल तर महाराष्ट्राची सामाजिक वीण कुठं तरी फाटली जातेय, उसवली जातेय, त्याबद्दल चिंता केली पाहिजे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रश्नामुळे गावगाड्यावर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य आपण करू नये, असेही फडणवीस म्हणाले.
…तर कितीही आरक्षण देऊन काय फायदा?
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की माझ्यासाठी जात, धर्म महत्वाचा नाही, माझ्यासाठी गरिबी ही एकच जात आहे. आरक्षणाची भावना गरिबीतून निर्माण होते. त्या भावनेपोटी आपण मागास आहोत, असे संबंधितांना वाटते. त्यामुळे आपण आरक्षण देऊच, पण मागासलेपणच दूर झाले नाही तर कितीही आरक्षण देऊन काय फायदा?, असे फडणवीस म्हणाले.