छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून कुलगुरूपदासाठी राज्यपालांनी स्थापन केलेल्या शोध समितीने २४ उमेदवारांना आज मुंबईत मुलाखतींसाठी पाचारण केले आहे. शोध समितीने या मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या २४ जणांमध्ये अवैध गुणवाढ प्रकरणात ४२० चा गुन्हा दाखल असलेले आणि परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी बंदी घातलेले डॉ. सतीश पाटील आणि परीक्षेच्याच कामात अनियमिततेचा ठपका तसेच १२७ कोटींच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी डॉ. भारती गवळी यांचाही समावेश आहे. न्यूजटाऊनने या दोघांच्या बाबतीत भंडाफोड केल्यानंतर वाद निर्माण झाला असून आता कुलगुरू शोध समिती या दोघांच्या मुलाखती घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. डॉ. येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांची मुदत पूर्ण होत असल्यामुळे नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्ध यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कुलगुरू शोध समितीने आज (बुधवारी) शॉर्टलिस्ट केलेल्या २४ जणांना मुलाखतीसाठी पाचारण केले आहे. मुंबईतील आयआयटी-पवईमध्ये या मुलाखती होणार आहेत. शोध समितीने मुलाखतीसाठी पाचारण केलेल्या उमेदवारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सतीश पाटील आणि याच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. भारती गवळी यांच्याही नावाचा समावेश असल्यामुळे शोध समितीने उमेदवारांची यादी शॉर्टलिस्ट करताना नेमके कोणते निकष लावले? असा प्रश्न उपस्थित करत न्यूजटाऊनने डॉ. सतीश पाटील यांची ‘चारसौ बीसी’ आणि डॉ. भारती गवळी यांच्या ‘दागी’ दामनचा भंडाफोड केल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातून कुलगुरू शोध समितीच्या प्रामाणिकपणावरच शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत.
न्यूजटाऊनने डॉ. सतीश पाटील आणि डॉ. भारती गवळींबाबत भंडाफोड केल्यानंतर अनेकांनी कुलगुरू शोध समितीशी संपर्क साधून आक्षेप नोंदवले. काही जणांनी तर थेट राज्यपाल तथा कुलपतींकडे लेखी तक्रारी केल्या. त्यानंतर कुलगुरू शोध समितीचे नोडल ऑफिसर म्हणून काम पहात असलेले श्रीनगर एनआयटीचे प्राध्यापक डॉ. जानीबुल बशीर यांनी शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार जोपर्यंत क्लिअरन्स दाखवणार नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार नाही, असे आश्वासन दिले होते.
नोडल ऑफिसर डॉ. जानीबुल बशीर यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम राहून कुलगुरू शोध समितीकडून डॉ. सतीश पाटील आणि डॉ. भारती गवळी यांच्याकडे खरेच क्लिअरन्सची मागणी केली जाते का? आणि तसे क्लिअरन्स सादर करण्यात हे दोघेही अपयशी ठरले तर कुलगुरू शोध समिती त्यांच्या मुलाखती घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आज मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू शोध समिती अंतिम पाच उमेदवारांची नावे राज्यपाल तथा कुलपतींकडे पाठवेल. राज्यपाल तथा कुलपती या पाच जणांमधून एका उमेदवाराची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड करतील. आजपर्यंत विद्यापीठात आलेल्या कुलगुरूंच्या बाबतीत ‘यांच्यापेक्षा आधीचे कुलगुरू बरे होते’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुलाखतीसाठी हे २४ उमेदवार
प्रा. डॉ. हरेंद्र सिंग, प्रा. विलास शेषराव खरात, प्रा. सतीश जगन्नाथ शर्मा, प्रा. राजीव गुप्ता, प्रा. सुभाष बाबुराव कोंडावार, प्रोफेसर डॉ. एस.के.सिंग, डॉ. गणेशचंद्र नरहरराव शिंदे, प्रा. विजय जनार्दन फुलारी, प्रा. संजय श्यामराव चव्हाण, प्रा. राजेंद्र बळीराम काकडे, प्रा. भारती वामनराव गवळी, प्रा. इंद्रप्रसाद त्रिपाठी, प्रा. डॉ. अनिल विश्वनाथ चांदेवार, प्रा. ज्योती प्रफुल्ल जाधव, डॉ. दत्तात्रय कृष्णा गायकवाड, प्रा. मनोहर गणपत चास्कर, प्रा. राजेंद्र गिरजप्पा सोनकवडे, प्रा. उदय श्रीरामराव अण्णापुरे, प्रा. अशोक महादू महाजन, प्रा. संदेश रोहिदास जडकर, प्रा. राजू निवृत्ती गच्चे, प्रा. डॉ. संजय दागा ढोले, डॉ. सतीश सुधाकरराव पाटील, प्रा. प्रमोद पांडुरंग माहुलीकर.
कुलगुरू शोध समितीत कोण?
एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्ध यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कुलगुरू शोध समितीमध्ये भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. जी. सुरेश, श्रीनगर येथील एनआयटीचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे सदस्य असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. श्रीनगर एनआयटीचे प्राध्यापक डॉ. जानीबुल बशीर हे नोडल ऑफिसर म्हणून काम पहात आहेत.