मुंबईः राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. ही विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे राहणार आहेत.
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात अशा प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात मुंबईचे डॉ. होमीभाभा राज्य विद्यापीठ, मुंबईचेच हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ, आणि साताऱ्याचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा अशी तीन समूह विद्यापीठे आहेत.
नेमकी कशी असेल प्रक्रिया?
- समूह विद्यापीठासाठी इच्छूक असणारे प्रमुख महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित आध्यापक तसेच समूह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय किंवा संस्था असावी.
- समूह विद्यापीठ तयार करण्यासाठी एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन व कमाल पाच अनुदानित किंवा विना अनुदानित महाविद्यालयाचे एकत्रिकरण करणे आवश्यक राहील.
- कृषी व आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व पारंपरिक व व्यवसायिक महाविद्यालये समूह विद्यापीठात समाविष्ट होऊ शकतील.
- पाच पेक्षा जास्त महाविद्यालये किंवा संस्था समूह विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासन मूल्यांकन करेल.
- समूह विद्यापीठातील प्रमुख महाविद्यालय मागील २० वर्षांपासून कार्यरत असावे. तसेच या महाविद्यालयात किमान दोन हजार विद्यार्थी असावेत तसेच ही संख्या मिळून सहभागी महाविद्यालयांमध्ये किमान चार हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे.
- या महाविद्यालयांकडे एकत्रितपणे १५ हजार चौरस मीटर इतके एकत्रित बांधकाम आवश्यक असून विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी चार हेक्टर जागा आणि राज्यातील उर्वरित भागासाठी सहा हेक्टर जागा असावी.
- प्रमुख महाविद्यालय हे किमान पाच वर्षांपासून स्वायत्त दर्जा प्राप्त असलेले असावे किंवा या महाविद्यालयास नॅकचे किमान ३.२५ सीजीपीए मानांकन किंवा समतुल्य एनबीए गुण असणे आवश्यक आहे किंवा एकूण अभ्यासक्रमांपैकी ५० टक्के अभ्यासक्रम एनबीए द्धारा मान्यताप्राप्त असावे.
याशिवाय इतरही काही आवश्यक बाबी या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आलेल्या आहेत.
विद्यापीठाचे कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह सात पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रुपये अशी रक्कम पहिल्या पाच वर्षांकरिता विद्यापीठाला देण्यात येईल.