मुंबईः अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तासांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता आहे. रविवारी मुंबई, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात दुपारनंतर उन्हाचे चटके असे रविवारी वातावरण होते.
एकीकडे राज्यात थंडी पडण्यास सुरूवात झालेली असतानाच दुसरीकडे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.