शनिवारपासून मुंबई मेट्रोच्या मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता


मुंबई मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३० वाजेऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार शनिवार, ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री ११ पर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

‘दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबई मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.

आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी ५:५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेच, रात्री १० नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या, तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम  दरम्यान २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

‘मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आत्तापर्यंत सुमारे ६ कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विविध उपाययोजना राबवित आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णय देखील मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.

दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढवण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही, तर कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात ती एक भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरताना दिसत आहे.

दररोज लाखो नागरिक मेट्रोने सुखकर असा प्रवास करू लागले आहेत. नागरिकांचे आयुष्य आणखी सुखकर होऊ लागले आहे. मेट्रोची वेळ वाढविल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पर्यावरणपूरक आणि इंधन, वेळेची मोठी बचत करणारी ही मेट्रो आपल्या मुंबईची शान ठरेल असा विश्वास आहे. आपली मेट्रो स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. फलाटावर आणि स्थानक परिसरातही सुरक्षा नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याचे सुचविले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!