एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची लई सवय, फडणवीसांचे नाव न घेता मनोज जरांगेंचा हल्लाबोल


जालनाः मराठा आरक्षणाच्या आडून हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. फडणवीसांच्या या इशाऱ्याला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील एक उपमुख्यमंत्री कलाकार आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाला काड्या करायची लई सवय आहे. त्यांना आयुष्यात जमले तरी काय? राज्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जबाबदार राहतील. दोनपैकी एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार असेल, कारण त्यालाच काड्या करण्याची लई सवय आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, या गृहमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत. आमदारांची घरे कुणी जाळली आम्हाला माहीत नाही. आंदोलनात तुमचेच लोक घुसवता आणि तुम्हीच जाळपोळ करून आमच्यावर आरोप करता. आमच्या पैश्यावर बासुंदी, गुलाब जामून खाल्ले. तुम्हाला काय करायचे ते करा… तुम्ही किती ताकदवर आहे हे आम्हालाही बघायचे आहे, करा ३०७ दाखल आमच्यावर, असे जाहीर आव्हानच जरांगे यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत दिले आहे.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चिघळून बीड, धाराशिवसह (उस्मानाबाद) अन्य ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दोन दिवस बंद राहणार आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील नागरिकांच्या मोबाइल फोनवर ‘सरकारच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, सेवा पुन्हा सुरळित होताच तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती देऊ,’ असे संदेश मोबाईल कंपन्यांनी पाठवले आहेत. यावरूनही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

इंटरनेट सेवा बंद करण्याशिवाय शिंदे सरकारला दुसरे काही काम आहे का?  हे असे बांडग्या भरल्यासारखे चाळे करायचे… यांना बांगड्या दिल्या पाहिजे… हे लोक मर्दासारखे सरकार चालवत नाहीत… आतून काड्या करतात. कुठे नेट बंद कर… कुठे अजून काहीतरी बंद कर… असे करून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु तुम्ही जातीविरोधात मैदानात उतरलात तर हे मराठ्यांचे आंदोलन आहे, हे लक्षात ठेवा. हे आंदोलन आता थांबणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

आक्रमक आणि हिंसक आंदोलन करणाऱ्यांनाही मनोज जरांगे यांनी फटकारले आहे. आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. तुमचे आंदोलन तुम्ही वेगळे करा, असे जरांगे म्हणाले. सरकारला उद्देशूनही जरांगे यांनी इशारा दिला आहे.

तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो. पण हा भाऊ सारखे दांडके घेऊन आमच्याकडे येणार असेल तर आम्हालासुद्धा आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. मग त्याला हे सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) याला जबाबदार असतील. त्यातला एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार असेल. कारण त्यालाच अशा काड्या करायची लई सवय आहे, अशा शब्दांत जरांगे यांनी फडणवीसांचे नाव न घेता हल्लाबोल केला.

जाती एकमेकांच्या अंगावर घालू नका

आम्ही आमचे आंदोलन शांततेत करणार आहोत. वातावरण जाणून बुजून खराब करू नका. जर उद्यापर्यंत आरक्षणासंबंधी ठोस पावले उचलली नाहीत तर उद्यापासून (बुधवार) मी पाणी सोडणार आहे. उद्या सकाळी (बुधवारी) बैठक बोलावली म्हणता. मग आज दिवसभर काय करत होते? आज रात्र आणि उद्या दिवस तुमच्याकडे आहे. जाती एकमेकांच्या अंगावर घालू नका, असेही जरांगे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!