ब्राह्मण असल्याचा अचानक न्यूनगंड का वाटावा? देवेंद्र फडणवीसांना ठाकरे गटाचा खोचक सवाल!


मुंबईः मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापू लागले असतानाच ‘मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केले जात आहे,’ असे वक्तव्य करून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टिकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच विधानाचा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समाचार घेतला असून ब्राह्मण असल्याचा अचानक न्यूनगंड का वाटावा? महाराष्ट्र कर्तबगारी आणि शौर्याला मानतो, ढोंग व कारस्थानाचा तिरस्कार करतो, अशा शब्दात ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून फडवीसांवर टिकास्त्र सोडले आहे.

‘फडणवीस यांच्यावर टीका केली की ते सांगतात, ‘मी ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केले जाते.’ स्वतः ब्राह्मण असल्याचा असा अचानक न्यूनगंड त्यांना का वाटावा? पेशव्यांच्या राघो भरारीबद्दल समस्त मराठ्यांना अभिमान आहे. चाफेकर बंधू, टिळक, वीर सावरकर, क्रांतीवीर फडके यांच्या शौर्याच्या आड ब्राह्मणत्व आले नाही. न्यायप्रिय रामशास्त्री हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत. नितीन गडकरी यांच्याविषयी कोणी चुकीची भाषा वापरत नाही.

मुख्य म्हणजे फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिली दोनेक वर्षे महाराष्ट्राने त्यांना डोक्यावरच घेतले होते. फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते मुख्यमंत्री नकोत, असा पवित्रा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने कधीच घेतला नाही व फडणवीस यांच्या विरोधात कोणी आंदोलन केले नाही. मोदींच्या मनात आले म्हणून फडणवीस मुख्यमंत्री झाले. यापेक्षा तेव्हा त्यांची कर्तबगारी नव्हती,’ असे या अग्रलेखात म्हटले आहे.

फडणवीसांनी स्वतःच स्वतःचे नेतृत्व संपवले

‘फडणवीस यांनी त्यांच्या पोटातले कारस्थानी दात बाहेर काढायला सुरूवात केली तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्याविषयी रोष निर्माण होऊ लागला. फडणवीस यांनी स्वतःच आपले नेतृत्व आणि प्रतिमा नष्ट केली आहे. महाराष्ट्राने अंतुले यांच्या रुपाने मुसलमान, सुशीलकुमार शिंदे यांच्या रुपाने कर्तबगार दलित मुख्यमंत्री स्वीकारला.

मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ब्राह्मण होते. महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र कर्तबगारी व शौर्याला मानतो. ढोंग व कारस्थानाचा तिरस्कार करतो. सध्या महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण सुरु आहे. त्याची सुरूवात महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली,’ असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

त्यांच्य मनातील उबळ वारंवार वर येते….

‘महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडीओ टाकून खळबळ उडवली. उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून लक्ष उडविण्याचा हा डाव असावा. फडणवीस आता सारवासारवी करतात की, ‘पुन्हा येईनचा व्हिडीओ टाकून मी परत कशाला येऊ?’ फडणवीस यांचे विधान हास्यास्पद व राजकारण पोरकटपणाचे आहे.

 त्यांच्या मनातली उबळ वारंवार वर येत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला आहे व सरकार सैरभैर झाले आहे. आता गावागावात साखळी उपोषणे सुरू झाली आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी करून रोष प्रकट केला जात आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला जात आहे. मंत्र्यांना कॉलर पकडून जाब विचारला जात आहे,’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

फडणवीसांचे डोके कारस्थानी कोतवालाचे…

‘आतापर्यंत चार जणांनी आत्महत्या केल्या, पण सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सापडत नाही. फडणवीस यांच्याकडे तोडगा आणि सेटलमेंटचे दुकान आहे. एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तर लगेच त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रिपद वाचवू, असा तोडगा त्यांनी दिला. फडणवीसांचे डोके नाना फडणवीसांचे असेल असे वाटले होते, पण ते पुण्याच्या तत्कालीन कारस्थानी कोतवालाचे दिसते.

शिंदे यांना विधान परिषदेवर आणून मुख्यमंत्रिपद टिकवले जाईल. पण अपात्र ठरणाऱ्या इतर मंत्री व आमदारांना कसे टिकवणार? फडणवीस शिंदे यांना टिकवणारा तोडगा देत आहेत, पण मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचे जीव वाचविणारा तोडगा देत नाहीत,’ असे टिकास्त्रही ठाकरे गटाने फडणवीसांवर सोडले आहे.

…हे अफझलखानी धोरण

‘राज्यातील बेकायदेशीर मिंधे सरकार टिकवणे ही त्यांची प्राथमिकता आहे. मराठ्यांची गरीब पोरे उपोषणाने मेली तरी चालतील, असाच एकंदरित कावा दिसतो. प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात- शिर्डीत येऊन गेले. ते शरद पवारांवर बोलले, पण मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर व आंदोलनावर बोलले नाहीत.

गावागावात उपोषणकर्त्यांचे जीव जात असताना प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन राजकीय चिखलफेक करतात, भाजपचा प्रचार करतात. हे अफझलखानी धोरण आहे,’ असेही ठाकरे गटाने या अग्रलेखात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!