नवी मुंबईः आपल्या अनोख्या किर्तन शैलीने देश-विदेशातील जनतेवर गारूड करणारे ज्येष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे आज पहाटे सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सातारकर यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
नवी मुंबईतील नेरूळ येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या वसाहतीत ते वास्तव्यास होते. नेरूळ जिमखान्यासमोर अलेल्या आणि बाबा महाराज सातारकरांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आज दुपारी तीन वाजल्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता नेरूळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव. परंतु त्यांच्या किर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळाले आणि तेच त्यांनी पुढे आयुष्यभर वापरले. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी वकीलीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यात किर्तन व प्रवचनाची परंपरा चालत आली होती.
वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून सातारकर फडाचे नाव घेतले जाते. दादा महाराज सातारकर यांनी या फडाची सुरूवात केली होती. हरिविजय, भक्तीविजय या ग्रंथावर ते प्रवचने देत. दादा महाराजानंतर अप्पा महाराजांनी ही धुरा सांभाळली. त्यांच्यानंतर अप्पा महाराजांचे पुतणे निळकंठ उर्फ बाबा महाराज सातारकर यांनी सातारकर फडाची धुरा यशस्वीपणे खांद्यावर घेतली. आता त्यांच्या कन्या हपभ भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.