पोलिस उपनिरीक्षक भरतीसाठी २ ते १० नोव्हेंबरदरम्यान शारीरिक चाचणी, एमपीएससीकडून वेळापत्रक जाहीर


मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षेअंतर्गत तब्बल दोन वर्षांनी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. २ ते १० नोव्हेंबरदरम्यान ही शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे एमपीएससीने जाहीर केले आहे.

एमपीएससीने घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून उत्तीर्ण झालेले उमेदवार शारीरिक चाचणीच्या वेळापत्रकाची आतूरतेने वाट पहात होते. आता हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून नवी मुंबईतील पोलिस मैदानावर २ ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. सुमारे दीड हजार भावी पोलिस उपनिरीक्षक या शारीरिक चाचणीला सामोरे जाणार आहेत.

याआधी ३१ ऑक्टोबरपासून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती.

आता या चाचणीसाठी २ ते १० नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पात्रताधारक उमेदवारांची यादी एमपीएससीने जाहीर केली असून त्यांच्या नावापुढे शारीरिक चाचणीची तारीख नमूद करण्यात आली आहे.

पुरुष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्स, लांब उडी आदी क्रीडा प्रकारात ही शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाणार आहे. या शारीरिक चाचणीत उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे गुणदान केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!