‘डॉ.बामु’ परिसराचे अभाविपकडून विद्रुपीकरण, महापुरूषांच्या नामफलकांचीही विटंबना; विद्यापीठ प्रशासनाचा मात्र कानाडोळा!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसराचे दिवसाढवळ्या विद्रुपीकरण केले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर- म. फुलेंसारख्या महापुरूषांचा नामोल्लेख असलेल्या फलकांवरही अभाविप अशी अक्षरे लिहून विटंबना करण्यात आली. हा सगळा प्रकार सुरू असताना विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि ‘कुशल’ प्रशासन मात्र अभाविपच्या या टगेगिरीकडे हेतुतः कानाडोळा करत राहिले.

कोट्यवधी रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या परिरात शंभरहून अधिक ठिकाणी अभाविप असे शब्द लिहिले. विद्यापीठाच्या विविध इमारतींच्या भिंती, नामफलकावर दिवसाढवळ्या विद्रुपीकरणाची ही मोहीम राबवण्यात आली.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा नामोल्लेख असलेल्या म. फुले-डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या फलकावरही अभाविप अशी अक्षरे लिहून विटंबना करण्यात आली. काही शैक्षणिक इमारतींच्या आतील परिसरातही अभाविप अशी अक्षरे कोरण्यात आली. अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून विद्रुपीकरणाची ही मोहीम सुरू असताना विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि विद्यापीठ प्रशासनाने अभाविपच्या कार्यकर्त्यांना हटकले नाही की कुणी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला नाही.

कायदेशीर कारवाई करा, नुकसान भरपाई घ्या

दरम्यान, विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण आणि महापुरूषांच्या नामफलकांची विटंबना करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून विद्रुपीकरण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई करून घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांची तोंडे रंगवण्यात येतील, असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने प्र. कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे देण्यात आला.

विद्यापीठ प्रशासनाकडूनच अभाविपला पाठबळ

विद्यापीठ प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारीच अभाविप संघटनेला जाणीवपूर्वक पाठबळ देत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून सदरील प्रकरणातही एक उच्चपदस्थ अधिकारी मध्यस्थी करून या कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या निवेदनात करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, विद्यापीठाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या रंगरंगोटीची नुकसान भरपाई घ्यावी व सुरक्षेच्या कामात कुचराई करणाऱ्या सुरक्षा एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सचिन निकम, कुणाल भालेराव, प्रवीण हिवराळे, सागर ठाकूर, विश्वजित गायकवाड आदींची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!