चेन्नईः १९६० च्या दशकात भारत घडलेल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचे गुरूवारी चेन्नईत निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. देशातील अल्पउत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या विविध प्रजाती विकसित करण्यातही डॉ. स्वामीनाथन यांची मोलाची भूमिका होती. ते एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक होते.
वयोमानपरत्वे जडलेल्या आजारामुळे आज गुरुवार, सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी डॉ. स्वामीनाथन यांनी चेन्नईतील तेनमपेट येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. डॉ. स्वामीनाथन यांच्या पश्चात एमएस स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौम्या स्वामीनाथन, अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन अशा तीन कन्या आहेत.
मन्कोम्बू स्माबासीवन स्वामीनाथन असे पूर्ण नाव असलेले डॉ. स्वामीनाथन लहानपणीच महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले होते. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती, मात्र ती न स्वीकारता डॉ. स्वामीनाथन शेतीविषयक अभ्यासासाठी नेदरलँडला गेले. बंगालमधील भूकबळीच्या घटनेमुळे ते खूपच अस्वस्थ झाले होते. तेव्हाच त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बवण्याचा निश्चय केला आणि त्या दिशेने त्यांनी मार्गक्रमणही केले.
१९६० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक म्हणून कार्यरत असताना डॉ. स्वामीनाथन यांना डॉ. बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या मेक्सिकन ड्वार्फ या नवीन प्रजाती विषयी माहिती मिळाली. त्यांनी डॉ. बोरलॉग यांना भारतात निमंत्रित केले. त्यांच्यासोबत काम करतानाच डॉ. स्वामीनाथन यांनी भारतात उच्च प्रतीच्या गव्हाचे उत्पादन घेतले. कोणती खते वापरून अधिक उत्पादन घेता येईल, याबाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले. डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांना यश येऊन भारतातील गव्हाचे उत्पादन चार हंगामात १.२ कोटी टनांवरून २.३ कोटी टनांवर पोहोचले.
डॉ. एम.एस. स्वामीनाथन हे १९६१ ते १९७२ अशी ११ वर्षे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयसीएआर) संचालक होते. १९९२ ते १९७९ या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषी विभागाचे सचिव होते. १९९८२ ते १९८८ अशी सात वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून काम पाहिले. डॉ. स्वामीनाथन यांना १९८७ मध्ये पहिल्या विश्व अन्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी २००४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेतकरी आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
स्वामीनाथन आयोगाने २००६ मध्ये त्यांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादन खर्चाच्या किमान दुप्पट असावा, अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने या अहवालात केली होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनामुळे अतीव दुखः झाले आहे. आमच्या देशाच्या इतिहासात एका महत्वपूर्ण काळात कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले आणि आमच्या देशाची अन्न सुरक्षा निश्चित केली,’ असे मोदी यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटले आहे.