‘भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ शब्द हटवले!’


नवी दिल्लीः भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द हटवण्यात आले आहेत, असा धक्कादायक दावा काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. ‘संविधानाची जी नवीन प्रत १९ सप्टेंबर रोजी आम्हाला देण्यात आली, संविधानाची ती प्रत हातात घेऊन आम्ही नवीन संसद भवनात गेलो, त्या प्रतीच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे दोन शब्द गायब आहेत,’ असे चौधरी म्हणाले.

सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व खासदारांनी संसदीय प्रणालीच्या इतिहासाविषयी चर्चा केली. याच दिवशी प्रधानमंत्री मोदींचेही भाषण झाले. विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (१९ सप्टेंबर) रोजी संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला सुरूवात झाली. नव्या संसदेत प्रवेश करताना खासदारांना देण्यात आलेल्या संसदेच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्दच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मंगळवारी नवीन संसदेत जाताना सर्व खासदारांना भारतीय संविधानाची प्रत, संसदीय इतिहासावरील पुस्तके, या दिवसाची खास आठवण म्हणून एक नाणे, स्टॅम्प देण्यात आले. हे सर्व ठेवण्यात आलेली एक बॅग खासदारांना देण्यात आली. यातील संविधानाच्या प्रतीमध्ये परस्पर मोठा बदल करण्यात आल्याचा दावा खा. अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.

१९७६ मध्ये घटना दुरूस्ती करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे दोन शब्द समाविष्ट करण्यात आले होते. जर आज आम्हाला कोणी संविधान देत असेल आणि त्या संविधानाच्या उद्देशिकेत हे दोन शब्द नसतील तर ती चिंतेची बाब आहे. त्यांचा हेतू संशयास्पद आहे. हे अत्यंत चतुराईने करण्यात आले आहे. मी हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु मला संधी देण्यात आली नाही, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

१९७६ मध्ये करण्यात आलेल्या ४२ व्या घटना दुरूस्तीत संविधानाच्या उद्देशिकेतील ‘सार्वभौम लोकशाही गणराज्य’ या शब्दांऐवजी ‘सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य’ असा बदल करण्यात आला होता. याच उद्देशिकेतील ‘राष्ट्राची एकता’ऐवजी ‘’राष्ट्राची एकता आणि अखंडता’ असा बदल करण्यात आला होता. ही घटना दुरूस्ती झाली तेव्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत आजपर्यंत झालेली ही एकमेव दुरूस्ती आहे.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या पक्षाचे अनेक नेते संविधान बदलण्याची मागणी करत आले आहेत. कधी संविधानाचा मूळ ढाचाच बदलण्याची मागणी भाजप समर्थक किंवा त्यांचे नेते करत आले आहेत. या पार्श्वभूमीवर खा. अधीर रंजन चौधरी यांनी केलेला आरोप गंभीर आहे. खा. चौधरी यांनी केलेल्या दाव्यानुसार जर भारत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी देश राहिला नसेल तर तो काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भाजप आणि आरएसएस भारताला हिंदू राष्ट्रात बदलू इच्छित आहेत, असा आरोप काँग्रेसचे अनेक नेते आणि त्यांच्या संघटनांनी वारंवार केला आहे. त्याचा पुरावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारी कार्यक्रमात होत असलेल्या पूजापाठचा ते हवाला देतात. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी धर्मनिरपेक्ष असावे, अशी संविधनाची अपेक्षा आहे. केंद्रातील सत्तेत आल्यानंतर भाजप हिंदू धर्माचा सरकारी पातळीवर प्रचार करत असल्याचा आरोपही केला जात आहे. आता खा. चौधरी यांच्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!