छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी अतिवृष्टी, तर रविवारी मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याला शनिवारी (१६ सप्टेंबर) ऑरेंज अलर्ट आणि रविवारी (१७ सप्टेंबर) यलो अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे वाहून विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कळवले आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळपास साडेतीन महिने उलटले तरी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच पाऊस छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याला झोडपण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार शनिवार आणि रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या शनिवारी जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ही घ्या खबरदारी

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने जिल्ह्यातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत. शनिवार आणि रविवारी शक्यतो बाहेर जाणे टाळा. शेतात काम करतांना शेताजवळील घराचा किंवा सुरक्षित स्थळाचा त्वरीत आसरा घ्या. ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जा. पोहणारे, मच्छीमारांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे. विद्युत उपकरणे बंद ठेवा तसेच लोखंडी पाईप, टेलिफोन व वीजेचे खांब, टॉवर, धातू इत्यादी वीज वाहक वस्तुंपासून दूर रहा, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.

आपल्या भागात अतिवृष्टी होत असल्यास गावचे तलाठी, पोलीस पाटील यांना कळवून तालुका व जिल्हा नियंत्रण कक्षासही दूरध्वनीद्वारे कळवावे. आपत्कालीन बॉक्स नेहमी आपल्या जवळ बाळगा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करणाऱ्या पथकाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहनही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

हे करणे टाळा

विजा चमकत असल्यास विजेच्या खांबाजवळ, झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर व झाडावर चढू नका.धातुंच्या वस्तुपासून दूर रहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दोनचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून शक्यतो प्रवास करुन नका. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका व मोबाईलाचा वापर टाळा, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!