छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर महामार्गांवर शुक्रवारी रात्री झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पुणे, अहमदनगर, बीड, जालना, पैठण मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने घेतला आहे. कन्नड, सिल्लोड मार्गावरील बस वाहतूक मात्र अंतरिम सुरू ठेवण्यात आली आहे.
दररोजच्या प्रवासी बस वाहतुकीतून औरंगाबाद जिल्ह्याला मिळणारे उत्पन्न ५० लाख रुपये आहे. मात्र वरील मार्गावरील बसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे सकाळच्या टप्प्यात १५ लाख रुपयांचे नुकसान झाले, असे औरंगाबादचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.
शनिवारी सकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार एसटीच्या ४ बसेस जाळण्यात आल्या आहेत तर ३ बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. एका चालकाला मारहाणही करण्यात आली असून एकाचा मोबाइल फोन फोडण्यात आला आहे.
आंदोलकांनी अचानक दगडफेक बस पेटवून दिल्यामुळे एका बसमधील चालकासह काही प्रवाश्यांना त्यांच्या बॅगाही बसमधून काढता आल्या नाहीत. शुक्रवारी रात्री साडेदहानंतर अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली. त्या आंदोलनाचे स्वरुप पाहता आणि मार्गावरील संपूर्ण परिस्थिती लक्षात घेल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.