छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा; अनुदान दिले, पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!’ हा न्यूजटाऊनने प्रसिद्ध केलेला विशेष वृतांत औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना चांगलाच झोंबल्यामुळे त्यांचे पित्त खवळले असून त्यांनी न्यूजटाऊनला तब्बल पाच पानी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आम्ही कर्तव्यपरायणता दाखवली आणि नियमित अनुदान निर्धारण केले, याचा मात्र डॉ. ठाकूर यांच्या नोटिशीत कुठेही उल्लेख नाही.
उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दरमहा नियमित अनुदान देण्यात आले परंतु दिलेल्या अनुदानाचा योग्य विनियोग झाली की नाही, याचे दरवर्षी अनुदान निर्धारणच केले नसल्यामुळे १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा झाला आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याबद्दलचा विशेष वृत्तांत न्यूजटाऊनने १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला. राज्यातील १ हजार १८७ अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे नियमाप्रमाणे दरवर्षी निर्धारणच करण्यात आले नाही. त्यामुळे जनतेच्या करातून गोळा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचे या वृत्तात म्हटले होते.
आवश्य वाचाः उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण सहसंचालकांनी निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!
न्यूजटाऊनचे हे विशेष वृत्त औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना चांगलेच झोंबले आणि त्यांनी न्यूजटाऊनला कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत माफी मागा अन्यथा बदनामी आणि गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया केली जाईल,अशी धमकी दिली आहे.
पुरावे आणि वस्तुस्थितीची खातरजमा केल्याशिवाय न्यूजटाऊन बातम्या प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे न्यूजटाऊनने विश्वासार्हता संपादन केली आहे. सहसंचालक ठाकूर यांनी न्यूजटाऊनला बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत या विशेष वृत्तात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कबुली दिली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे अनुदान निर्धारण करण्याची जबाबदारी विभागीय सहसंचालक कार्यालयाचीच आहे, हे डॉ. ठाकूर या नोटिशीत स्वतःच मान्य करतात. तरीही त्यांची व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदनामी झाली, त्यांना गंभीर मानसिक इजा पोहोचल्याचे सांगतात. त्यांच्या या नोटिशीचा मुद्देनिहाय पंचनामा…
पुढील भागातः नोटिशीच्या धाकाने न्यूजटाऊनचा आवाज दबणार नाही, सहसंचालक ठाकूर हिम्मत असेल तर आव्हान स्वीकारा आणि ‘या’ प्रश्नांची जाहीर उत्तरे द्या!
न्यूजटाऊनने बदनामीकारक, निंदनीय, खोटी, बेपर्वा विधाने आणि बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्यापक प्रमाणात प्रसिद्ध केली. उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जनतेनेही ही बातमी मोठ्या प्रमाणात वाचली. त्यामुळे विभागीय सहसंचालक आणि त्यांचे अधिकारी/कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा कमी झाली, असे सहसंचालक डॉ. ठाकूर यांनी न्यूजटाऊनला दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीत म्हटले आहे.
अनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या निकषांची माहिती न घेता आपण खोटी आणि बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गंभीर मानसिक इजा पोहोचली. विभागीय सहसंचालक कार्यालयासह उच्च शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या आणि कलंकित करण्याच्या दुष्ट हेतूने ही बातमी प्रसिद्ध केली. न्यूजटाऊनचे हे कृत्य कायद्याच्या आणि घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे, असेही या नोटिशीत म्हटले आहे.