‘पीईएस’मध्ये संघाच्या ऍनाकोंडाच्या घुसखोरीविरुद्ध आंबेडकरी जनतेचा एल्गार, विभागीय आयुक्तालयावर धडकणार महामोर्चा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अर्थात पीईएस संस्थेच्या सदस्यपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपशी संबंधित व्यक्तींची निवड करण्याच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या निर्णयाविरुद्ध आंबेडकरी समाज पेटवून उठला आहे. पीईएसमध्ये घुसलेला हा संघाचा ऍनाकोंडा ठेचून काढण्यासाठी आंबेडकरी जनतेने एल्गार पुकारला आहे. या ही घुसखोरी थोपवून पीईएस वाचवण्यासाठी येत्या काही दिवसांत विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी भाजपचे माजी आमदार श्रीकांत जोशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू निवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य सहा जणांची नियुक्ती करण्याचा निर्णय डॉ. एस.पी. गायकवाड यांनी मिलिंद महाविद्यालयात १० ऑगस्ट रोजी झालेल्या कथित बैठकीत घेतला. डॉ. गायकवाडांचा हा निर्णय म्हणजे बाबासाहेबांची पीईएस आरएसएसच्या घशात घालण्याचे षडयंत्र असल्याची भावना आंबेडकरी समाजाची झाली आहे.

हेही वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी, ‘महाउपासक’ गायकवाडांकडून ‘रेशीमबागे’ची उपासना!

संस्थेचे अध्यक्ष असल्याचा दावा करणारे डॉ. एस.पी. गायकवाड यांच्या या निर्णयाविरुद्ध आंबेडकरी समाजातून संपप्त प्रतिक्रिया उमटत असून त्याचे तीव्र पडसाद आज दुपारी औरंगाबादच्या नागसेनवनातील मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये झालेल्या आंबेडकरी समाजाच्या बैठकीत उमटले.

हेही वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाच्या ऍनाकोंडाच्या घुसखोरीमुळे आंबेडकरी समाज संतप्त, २० ऑगस्टला ठरणार आंदोलनाची दिशा

डॉ. गायकवाडांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी अन्यथा…

डॉ. एस.पी. गायकवाड यांच्या कार्यकाळात पीईएसची वाताहात झाली आहे. त्यामुळे डॉ. गायकवाड यांनी आता स्वतःहोऊन पीईएसमधून सन्मानाने स्वेच्छानिवृत्ती घ्यावी. ते जर स्वतःहोऊन पीईएसमधून बाजूला होणार नसतील तर त्यांचा बळजबरीने राजीनामा घेऊन त्यांना पीईएसमधून हाकलून लावावे, असा सूर आजच्या बैठकीत उमटला. औरंगाबाद वगळता पीईएसच्या कोणत्याच महाविद्यालयात डॉ. गायकवाड आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पाय ठेवू दिला जात नाही. परंतु नागसेनवनातील काही प्राचार्यच डॉ. गायकवाडांचे भाट बनले असून स्वतःच्या स्वार्थासाठी ते संस्थेच्या अधोगतीला हातभार लावत आहेत, असा आरोपही या बैठकीत करण्यात आला.

हेही वाचाः ‘पीईएस’मध्ये संघाचा ऍनाकोंडाः आंबेडकरी समाजाच्या संतापानंतर डॉ. एस. पी. गायकवाडांची कल्टी; आता म्हणतात ना बैठक झाली, ना सदस्य नेमले!

 डॉ. एस.पी. गायकवाड यांनी येत्या काही दिवसांत स्वतःहोऊन राजीनामा दिला नाही तर त्यांना नागसेनवनात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या बैठकीतून एकमुखाने देण्यात आला. त्यामुळे नजीकच्या काळात डॉ. एस.पी. गायकवाड नागसेनवनात फिरकले तर मोठा गोंधळ होण्यची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.

पीईएस बचावचे आंदोलन होणार राज्यव्यापी जनआंदोलन

पीईएस संस्थेचा विस्तार महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतही पसरलेला आहे. त्यामुळे पीईएस बचावचे हे आंदोलन केवळ औरंगाबाद पुरतेच मर्यादित न ठेवता या आंदोलनाला राज्यव्यापी जनआंदोलनाचे स्वरुप देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. या आंदोलनात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींना सामावून घेऊन आंबेडकरी समाजाच्या उत्थानासाठी पीईएसचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य अबाधित राखणे किती आवश्यक आहे, याबाबत आंबेडकरी समाजाच्या वस्त्यावस्त्यांत जाऊन व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

या जनजागृतीमुळे आंबेडकरी समाज स्वयंस्फूर्तीने आणि मोठ्या संख्येने या जनआंदोलनात सहभागी होईल आणि या जनआंदोलनाच्या रेट्यापुढे पीईएसकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत कुणीही करणार नाही, असा सूरही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

‘संघाचा ऍनाकोंडा’ ठेचण्यासाठी दाखवणार मैदानावरील हिसका!

पीईएसच्या सदस्यपदी आरएसएस-भाजपच्या दोन व्यक्तींची नियुक्ती हा केवळ खडा टाकून पाहण्याचा प्रयत्न आहे. या नियुक्त्यांवरून आंबेडकरी समाजातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहून नंतर हळूच ही संस्था आपल्या घश्यात घालण्याचा आरएसएसचा डाव आहे. त्यामुळे आंबेडकरी एकजुटीचा मैदानावरील हिसका दाखवल्याशिवाय संघाचा हा ऍनाकोंडा ठेचला जाणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत क्रांतीचौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आंबेडकरी जनतेचा महामोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.

किमान एक ते दीड लाख आंबेडकरी जनता या मोर्चात सहभागी होईल, अशा रितीने नियोजन केले जाणार आहे. या मोर्चाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रभरातील आंबेडकरी जनतेनेही या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

बाबासाहेबांची पीईएस आंबेडकरी घराण्याकडे सोपवा!

चोर आणि लुटारूंमुळे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीईएसची वाताहात झाली आहे. या चोर आणि लुटारूंनीच आंबेडकर कुटुंबातील कोणाही व्यक्तीला पीईएसच्या कार्यकारिणीवर घेऊ नका, असे बाबासाहेबांनी संस्थेच्या घटनेतच लिहून ठेवल्याचा अपप्रचार करून मलिदा लाटला आहे. वस्तुतः पीईएसच्या घटनेत अशी कोणतीही तरतूद नाही. तशी तरतूद असती तर १९६५ मध्ये भैय्यासाहेब आंबेडकर हे पीईएसचे सदस्यच बनले नसते. परंतु पीईएसभोवती विळखा टाकून बसलेल्यांनीच आंबेडकरी समाजात अपप्रचार करून गैरसमज पसरवले. त्यामुळे आतापर्यंत बाबासाहेबांच्या कुटुंबाला या संस्थेपासून हेतुतः दूर ठेवण्यात आले.

पीईएसचे स्वातंत्र्य आणि अस्तित्व अबाधित राखण्याचे काम आंबेडकर कुटुंबच ताकदीने करू शकते, त्यामुळे पीईएस संस्था आंबेडकर कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात यावी, अशी आग्रही मागणीही या बैठकीत करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच मनात आणि बोलण्यात हीच भावना होती.

एकच व्यक्ती सूचक आणि अनुमोदक, ही कुठली लोकशाही?

डॉ. एस.पी. गायकवाड यांच्या गटाचा पीईएसवर सध्या एकच म्हणजे स्वतः गायकवाड हेच एकमेव सदस्य आहेत. १० ऑगस्ट रोजी मिलिंद महाविद्यालयात झालेल्या कथित बैठकीत डॉ. एस.पी. गायकवाड यांनीच श्रीकांत जोशी, राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य सहा जणांची नावे सूचवली आणि त्यांनीच या नावांना अनुमोदनही दिले. ही कुठली लोकशाही आणि धर्मादाय कायद्यातील कोणती तरतूद? असा सवाल या बैठकीत करण्यात आला.

एकच व्यक्ती सूचक आणि अनुमोदक अशी कुठल्याही कायद्यात तरतूद नाही. परंतु डॉ. गायकवाड हे पीईएस म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता समजत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लोकशाहीचा पाया रोवला. त्याच बाबासाहेबांच्या संस्थेत लोकशाहीची अशी विटंबना डॉ. एस. पी. गायकवाडांकडून केली जात आहे. त्यामुळे त्यांना पीईएसवर एक क्षणही राहण्याचा अधिकार नाही, अशा संतप्त भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!