मुंबई: समता चळवळीतील आघाडीचे शिलेदार, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासू संशोधक हरी नरके यांचे आज निधन झाले. हरि नरके यांच्या निधनाने बहुजन चळवळीची अपरिमित हानी झाली आहे.
हरि नरके यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. एशियन हार्ट रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महात्मा फुले समग्र साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते.
राज्य शासनाच्या महात्मा फुले साहित्य समितीवरही त्यांनी महत्वाचे योगदान दिले. राज्य मागासवर्ग आयोगावरही त्यांनी काम केले.
महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी- एक सत्यशोधन इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले होते. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतही हरि नरके यांनी काम केले.
मराठी भाषा ही तेलुगू, कन्नड, संस्कृत भाषेप्रमाणेच अभिजात मराठी भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीचे प्रमुख समन्वयक म्हणून त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.