राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयंत पाटलांनी अमित शहांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा, महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप?


पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट घडवून आणण्यात आल्याचे सांगितले जात असून त्यामुळे जयंत पाटील हेही शरद पवारांना सोडून भाजपशी ‘सहकार’ करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल शनिवारपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यानंतर आज सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अमित शहा आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याची चर्चा आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेडब्ल्यू मेरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरेही भाजपसोबत जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या गुप्त भेटीत अमित शाह, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे चौघेच नेते होते. या चार नेत्यांमध्ये सुमारे तासभर खलबते झाली. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते. मुख्यमंत्री शिंदे हे पुण्यात असूनही या भेटीच्या वेळी त्यांना टाळण्यात आले.

 अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आणि भाजपसोबत जाऊन त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या फुटीनंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने बळकटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय बोलून दाखवला होता खरा, परंतु आज त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे तेही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसे झाले तर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.

दरम्यान, जयंत पाटील थोड्यावेळानंतर माध्यमांशी बोलणार असून ते या भेटीचे वृत्त स्वीकारतात की फेटाळून लावतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु शनिवारपासूनच जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गोटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे आता जयंत पाटलांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!