मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी (२७जुलै) सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘पीएम किसान संमेलन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान योजनेतील ८.५ कोटी लाभार्थींच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम एका क्लिकद्वारे वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.
प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना, त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य तीन हप्त्यात देण्यात येते.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी २ हजार रुपयांचे एकूण १३ हप्ते ११ कोटी शेतकऱ्यांना अशी एकूण २ लाख ४२ हजार कोटी रुपये रक्कम आतापर्यंत वितरित करण्यात आली असून गुरुवारी १४ व्या हप्त्यापोटी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या किसान संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी हे देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, असे मुंडे म्हणाले.
या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. किसान संमेलनाची वेबलिंक – http://pmevents.ncog.gov.in/ अशी आहे.