मुंबई: जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू असलेल्या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षेत जुन्याच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची घटना गंभीर आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी विद्यापीठाकडून तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे.या समितीचा निकाल आला असून हैदराबादच्या कोएम्प्ट एज्युटेक प्रा. लि. या संस्थेकडून प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी मांडली होती.त्याला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०२३ च्या परीक्षा एप्रिल २०२३ पासून विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या.
ऑक्टोबर, २०२२ च्या परीक्षेपासून प्रथमच ऑनलाइन सिस्टिम द्वारे प्रश्नपत्रिका मागवणे, प्रश्न संचांची निवड करणे आणि प्रश्नपत्रिका वितरित करणे ही कार्यप्रणाली कोविड- २०१९ नंतर प्रथमच वापरण्यात आली होती, असे पाटील म्हणाले.
व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या उन्हाळी- २०२३ च्या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका मागील परीक्षेच्याच पाठवण्यात आल्याबाबत विद्यार्थी संघटनेकडून तक्रारवजा निवेदन विद्यापीठास प्राप्त झाले. यामध्ये झालेली चूक लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या ज्या पाच विषयांच्या प्रश्नपत्रिका मागील परीक्षेच्याच पाठवल्या गेल्या होत्या, त्या पाच विषयांच्या परीक्षांचे विद्यापीठामार्फत पुन्हा आयोजन करण्यात आले व ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडलेली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, असे पाटील म्हणाले.
या संदर्भात चौकशीसाठी विद्यापीठाकडून तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत कोएम्प्ट एज्युटेक प्रा. लि. या कंपनीकडून ऑनलाइन प्रश्नपत्रिका मागवणे आणि प्रश्नपत्रिकांची निवड करणे या प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या सेवा त्वरित रद्द करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे असे पाटील यांनी सांगितले.