‘ईडी’च्या धास्तीमुळे नव्हे तर डिंभेच्या पाण्यासाठी पवार साहेबांच्या प्रेमावर ‘पाणी’ सोडलेः वळसे पाटलांचा ‘विकासात्मक’ खुलासा


आंबेगावः ईडीमुळे मी पवार साहेबांची साथ सोडली नाही. माझ्या निर्णयामागे काहीही वैयक्तिक हित नाही. ईडीची भीती किंवा सत्तेच्या हव्यासामुळे आपण पवार साहेबांची साथ सोडली नाही तर डिंभे धरणाच्या पाण्यासाठी आपण पवार साहेबांची साथ सोडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडून गेलेले त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या बंडामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे आमदार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांची. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वळसे पाटील हे बंडखोरांसोबत गेल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आज वळसे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन मंचर येथे कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

माझ्यासमोर मोठा पेच होता. मधल्या काळात एक घटना घडली. डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे नेण्याचा पाटबंधारे विभागाकडे एक प्रस्ताव आला. पाणी आपली वैयक्तिक मालमत्ता नाही. मी पवार साहेबांकडे गेलो. दोन बैठका झाल्या. ७१२ मीटर बोगदा घ्यायचे ठरले. परंतु सरकारने धरणाच्या एकदम तळाशी बोगदा घेण्याचा निर्णय घेतला. फडणवीसांनी तसा प्रस्तावही पाठवला. डिंभे धरणाचा बोगदा जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यात जे ६५ बंधारे बांधले आहेत, हे बंधारे पावसाने भरले तितकेच पाणी मिळेल, असे सरकारने म्हटले. या परिसरात पाच साखर कारखाने आहेत. मग उसाला पाणी मिळाले नाही आणि उस पिकला नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडून जाईल. म्हणून आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मी काय हयातभर आमदार राहणार नाही. मात्र अशी परिस्थिती झाली तर आपला परिसर दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही, हे मनाला खटकत होते. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला. मात्र अशा कामांना सत्तेत राहणे गरजेचे असते. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. काही लोक म्हणतील सत्तेच्या बाहेर राहूनही हे झाले, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

ईडीमुळे मी पवार साहेबांची साथ सोडली नाही. मी जाहीर करतो की, मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची कसलीही नोटीस आलेली नाही. काहीही वैयक्तिक हित माझ्या निर्णयामागे नाही. एका विद्वानाने सांगितले की, पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून मी असे केले. मात्र माझा आणि या डेअरीचा काडीचाही संबंध नाही. आमच्या कुटुंबातील एखाही व्यक्तीची या डेअरीमध्ये एक रुपयाही गुंतवणूक नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

आपली लढाई साहेबांशी नाही. मी तर उलट सांगेन की, आपल्या आंबेगावमध्ये जेव्हा सभा होईल, तेव्हा तुम्ही सगळे त्या सभेला आवर्जून जा. उद्याच्या निवडणुकीत काय होईल, याची मी चिंता करत नाही. काहींनी निष्ठेचा प्रश्न निर्माण केला आहे. वळसे पाटलांनी निष्ठा विकली असे ते म्हणत आहेत. ठीक आहे, मला त्याची शिक्षा द्या, असेही वळसे पाटील म्हणाले.

 एकनाथ शिंदे जेव्हा सगळे आमदार घेऊन गेले, तेव्हा दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री म्हणून मदत केली, असा आरोप करण्यात आला. आता साधा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे गेल्यावर माझेही पद जाणार आहे, मीही सत्तेबाहेर असणार आहे. उलट उद्धव ठाकरेंना आम्ही सहा महिन्यांपासून सांगत होतो की, तुमचे आमदार फुटणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कळवले होते. मग मी मदत करण्याचा प्रश्नच येतो कुठे? असे वळसे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *