समृद्धी महामार्गावरील अपघातात जो मृत्यू पावतो, तो ‘देवेंद्रवासी’ होतो असे लोक बोलतातः शरद पवार


मुंबईः समृद्धी महामार्गावरील अपघातात जो व्यक्ती मृत्यू पावतो, तो ‘देवेंद्रवासी’ झाला असे लोक बोलतात. तो रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण आज झालेली अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.

 समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले.

समृद्धी महामार्गाच्या बांधकामात त्रुटी, कमतरता असल्याची शक्यता शरद पवार यांनी बोलून दाखवली. समृद्धी महामार्गावरील बसच्या अपघाताचे कारण कदाचित या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने नियोजन न करणे, हे असावे. त्याचा परिणाम म्हणून या महामार्गावर लोक मृत्यूमुखी पडत आहेत, असे शरद पवार म्हणाले.

समृद्धी महामार्गावरून मी गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक सांगत होते की, या महामार्गावर एखाद-दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली तर लोक असे म्हणतात या अपघातात एक जण ‘देवेंद्रवासी’ झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात, नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनाच लोक दोषी ठरवतात, असेही शरद पवार म्हणाले.

मी काही किलोमीटर समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे. रस्ता म्हटले की, काही खुणा डोक्यात असतात, की इथे झाड आहे, काही ठिकाणी वळण आहे. मात्र हा सलग सरळ रस्ता आहे. वाहन चालवणाऱ्यावर याचा काही परिणाम होतो का?  अशी शंकाही लोकांनी बोलून दाखवली आहे. मात्र मी काही त्यातला तज्ज्ञ नाही. परंतु कुठे त्रुटी राहिल्या आहेत, हे पाहिले गेले पाहिजे, असे पवार म्हणाले.

 समृद्धी महामार्गावर सतत अपघात होत आहेत. जी घटना घडली आहे, ती अत्यंत दुःखद आहे. २५ माणसे गेली ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय की अपघात झाला की राज्य सरकारने पाच लाख रुपये दिले. पाच लाख रुपये मोजून हे प्रश्न सुटणार नाहीत. यासंदर्भात देशात रस्ते, त्यांचे नियोजन याचे ज्ञान असणारे कर्तबार लोक आहेत. त्यांची टीम तयार करावी. त्यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी करून घ्यावी आणि कुठे चूक झाली हे शोधून काढावे. अपघाताची स्थिती, वाढते अपघात हे थांबतील कसे हे बघायला हवे. पाच लाख रुपये जाहीर करून प्रश्न सुटणार नाहीत, अशा शब्दांत शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले.

समृद्धी महामार्गाबाबत कोणी निर्णय घेतला?  ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनी जाणकारांचा सल्ला घेतला असेल. जर जाणकारांच्या सल्ल्याविना हे केले असेल तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारची आहे. अपघातासाठी वाहनचालकांची चूक कारणीभूत असल्याचे सांगणे म्हणजे आपली कमतरता दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जगातील जज्ज्ञांकडून या महामार्गाची पाहणी केली पाहिजे. काहीही करून लोकांचे प्राण वाचले पाहिजे, असे पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *