छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): सम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगी होते, असे वादग्रस्त ‘किर्तन’ करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांना हे ‘किर्तन’ चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. असे वक्तव्य करून लिंगभेदाचे उघडपणे ‘प्रबोधन’ करणाऱ्या इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
अस्सल गावरान भाषेतील किर्तनाच्या शैलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली जातात. या वक्तव्यांवरून वाद निर्माण होऊन ती अंगलट येण्याची शक्यता दिसू लागली की इंदुरीकर महाराज बोलण्याच्या ओघात झाले, आपला तसा हेतू नव्हताच, असे म्हणत अनेकदा माघारही घेतात. परंतु अशाच एका किर्तनात लिंगभेदाबाबत केलेले वक्तव्य त्यांची पाठ सोडायला काही तयार नाही.
इंदुरीकर महाराज यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या किर्तनातून सम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगी होते, असे ‘अगाध प्रबोधन’ केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.
लिंगभेदाला उघडपणे खतपाणी घालणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु संगमनेर सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचा आदेश रद्दबातल ठरवला होता.
सत्र न्यायालयाच्या या आदेशाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीअंती औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारच्या या याचिकांवर आज सुनावणी झाली. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचे व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध असल्याचे सांगत हे व्हिडीओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले. सुनावणीअंती औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना समविषम चांगलेच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.