मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काल मंगळवारी केलेल्या ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातबाजीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाल्यानंतर आणि शिंदे-फडणवीसांच्या युतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरकसपणे होऊ लागल्यामुळे आज बुधवारी शिंदे गटाने नवीन जाहिरात देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकवत आज शिंदे गटाने ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी केली. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रातील जनतेची जास्त पसंती असल्याचा दावा करणाऱ्या कालच्या जाहिरातीनंतर गदारोळ उठल्यानंतर आज शिंदे गटावर ‘चरणी माथा’ टेकवणारी जाहिरातबाजी करण्याची वेळ आली.
शिवसेनेच्या शिंदे गटाकडून महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मंगळवारी (१३ जून) भली मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा हवाला देत महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी पहायचे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रिपदी पहायचे आहे, असा दावा करण्यात आला होता. लोकप्रियतेच्या बाबतीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक सरस आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून करण्यात आला होता.
शिंदे गटाची ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्यासाठी आणि फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे नेतृत्वाच्या बाबतीत कसे सरस आहेत, हे दाखवण्यासाठीच ही जाहिरातबाजी करण्यात आल्याची चर्चाही रंगली होती. भाजपने या जाहिरातीवर उघड नाराजी व्यक्त केली होती.
शिंदे गटाच्या या जाहिरातबाजीमुळे शिंदे-फडणवीस युतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चाही नव्याने सुरू झाली. या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेच फोटो असल्यामुळे आरोप-प्रत्यारोपाची राळही उडाली. महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचा या जाहिरातीत फोटो तर नव्हताच, शिवाय त्यांच्यापेक्षा शिंदे हेच महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, असा दावाही करण्यात आला होता.
या जाहिरातीचे साईड इफेक्ट दिसू लागताच शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी सारवासारव करत ही जाहिरात शिवसेनेने दिली नसून आमच्या हितचिंतकाने दिली असावी, असा खुलासाही केला होता.
शिंदे गटाच्या मंगळवारच्या जाहिरातबाजीमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि युतीत तणाव निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागल्यामुळे आज शिंदे यांच्या शिवसेनेने सावध भूमिका घेत नवीन महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रात आज बुधवारी कालच्या एवढ्याच आकाराची नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशा शिर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो छापण्यात आला. शिवाय शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे फोटोही छापण्यात आले.
या जाहिरातीत भाजप-शिवसेना या डबल इंजिन सरकारच्या लोकप्रियतेचा पाढा वाचण्यात आला. एवढेच नव्हे तर लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधकांना मिळालेली टक्केवारीही प्रसिद्ध करण्यात आली. जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाला ४९.३ टक्के आशीर्वाद तर प्रमुख विरोधक २६.८ टक्के आणि अन्यांना २३.९ टक्के पसंती मिळाल्याचे या जाहिरातीत नमूद करण्यात आले.
या जाहिरातीचे वैशिष्ट्ये असे की, कालच्या जाहिरातीत फक्त शिंदे आणि मोदींचेच फोटो छापण्यात आले होते. आजच्या जाहिरातीत शिवसेनेच्या सर्व नऊही मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले. जाहिरातीच्या सुरूवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो छापण्यात आले.
कालच्या जाहिरातीमुळे उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आजची जाहिरातबाजी करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. ‘हम साथ साथ है’ असे दाखवण्याचा प्रयत्न या जाहितीतून झालेला असला तरी शिंदे गटाची आजची जाहिरातबाजी म्हणजे सपशेल माघार घेत ‘महाशक्तीच्या चरणी माथा’ टेकवणारी असल्याची टीकाही सोशल मीडियावर केला जाऊ लागली आहे.
नव्या जाहिरातीवरही प्रश्नचिन्ह
शिवसेनेच्या शिंदे गटाने आज प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरही काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या जाहिरातीत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासोबतच भाजपचेही निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र ‘महाराष्ट्रातील तमान जनतेचे मनःपूर्वक आभार’ मानताना मात्र केवळ शिवसेनेच्याच मंत्र्यांचे फोटो का? असा सवाल केला जाऊ लागला आहे. हे सर्वेक्षण कुणी केले? याचा स्त्रोतही या जाहिरातीत सांगण्यात आलेला नाही. त्यावरही सवाल केले जाऊ लागले आहेत.