मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी कन्या खासदार सुप्रिया सुळेंची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक केली. या नेमणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे या सर्वात शक्तिशाली बनल्या असून लोकसभा निवडणुकीत कोणाला तिकिट द्यायचे आणि कोणाचा पत्ता कट करायचा याचा निर्णयही आता सुप्रिया सुळेच घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या तिकिटवाटपातही सुळेंचाच वरचष्मा राहील, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते.
महिनाभरापूर्वी ‘लोक माझे सांगांती’ या राजकीय आत्मकथनाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. कार्यकर्ते आणि नेत्यांची नाराजी आणि दबावामुळे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. शरद पवारांच्या या राजीनामा नाट्यानंतर महिनाभरातच शरद पवारांनी खा. सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक केली.
खरे तर शरद पवारांच्या राजीनामा नाट्याच्या वेळीच खा. सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड केली जाणार होती. शरद पवारांच्या नंतर पक्षात नव्या नेतृत्वाची फळी उभी राहिली पाहिजे आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नवे नेतृत्व तयार झाले पाहिजे, असे सांगत तेव्हाच शरद पवारांना अध्यक्षपदी कायम ठेवून कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची वर्णी लावण्याचे नियोजन होते. परंतु त्यावेळी फक्त शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला होता.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक केली. ही नेमणूक करताना सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जवळपास सर्वच सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याच ताब्यात आल्याचे स्पष्ट संकेतच यातून मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य जनाधार हा महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे या पक्षात राहून राष्ट्रीय पातळीवर राजकारण करण्याला तशा मर्यादाच आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवण्यात आली असली तरी राष्ट्रीय पातळीवर संसदेत बाजू मांडण्यापलिकडे अन्य राज्यात करण्यासारखे फारसे काही नाही. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य जनाधार असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्राच्या जबाबदारीबरोबरच लोकसभा निवडणुकीची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि नियोजन सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तिकिटवाटपाचे निर्णयही आता सुप्रिया सुळेच घेतील, असे बोलले जाऊ लागले आहे.
लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तिकिटवाटपातही सुप्रिया सुळे यांंच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही सुप्रिया सुळे यांच्याच मर्जीतील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे याच सर्वात शक्तिशाली नेत्या म्हणून पुढे आल्या आहेत.