मुंबईः मान्सूनचे आज गुरूवारी केरळमध्ये आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. यंदा तब्बल सात दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. साधारणपणे दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होते. महाराष्ट्रात १६ जून रोजी मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने आज गुरूवारी केरळमध्ये प्रवेश केला. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरू आहे. केरळ, दक्षिण तामीळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारच्या आखातात मान्सून दाखल झाला आहे.
आज सकाळपासूनच केरळमध्ये सर्वच भागात पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी १ जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. मात्र यंदा मान्सून तब्बल ८ दिवस उशिराने म्हणजे ८ जून रोजी दाखल झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता मान्सून तळ कोकणात १६ जूनला दाखल होऊ शकतो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यास साधारणपणे ७ दिवसाचा वेळ लागतो. त्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून १६ जून रोजी दाखल होईल.