मुंबईः काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढू लागल्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन त्यांच्या जागी सर्वमान्य असे नेतृत्व प्रदेश काँग्रेसला देण्याच्या हालचाली काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुरू केल्या असून अमरावतीतील काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता असल्याचे समजते.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. त्यातच विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढला आहे. नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील काही नेत्यांत त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष असल्याचे सांगितले जाते. हा असंतोष आता उघडपणे बाहेरही येऊ लागला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाना पटोले यांची तक्रार केली होती.
बाळासाहेब थोरातांनी तक्रार करून झाल्यावर आता विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही नाना पटोले यांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे यासाठी विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे हे दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत.
नाना पटोले यांना वाढत असलेला विरोध पाहता त्यांच्या जागी सर्वांना मान्य होईल असा आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याची क्षमता असलेले नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला देण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात असलेले काँग्रेसचे मातब्बर नेते, त्यांच्या विरोधातील पक्षांतर्गत लॉबी या सगळ्या बाबींचा विचार करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला नवीन नेतृत्व देताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींची तारेवरची कसरत होणार आहे. कोणत्याही नेत्याकडे प्रदेश काँग्रेसची धुरा सोपवल्यानंतर चार-सहा महिन्यांतच त्याच्याविरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करायला सुरूवात होते, हा काँग्रेसचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाबद्दल किमान आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत तरी ‘तक्रारपर्व’ सुरू होऊ नये, याची खबरदारी नवे नेतृत्व निवडताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे.
नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील, सुनिल केदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या या नावांमध्ये यशोमती ठाकूर यांचे नाव सगळ्यात पुढे असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकवला होता.
स्थानिक राजकारणावर घट्ट पकड आणि प्रदेश पातळीवर काम करण्याचा अनुभव या यशोमती ठाकूर यांच्या जमेच्या बाजू आहेत. स्पर्धेत असलेल्या अन्य नेत्यांपेक्षा त्यांना होणारा पक्षांतर्गत विरोधही तुलनेने कमी होऊ शकतो, हे गृहितक लक्षात घेऊन यशोमती ठाकूर यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणे जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसला मिळणार नवीन गटनेता
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आपण गटनेतेपदी कायम राहण्यास इच्छूक नसल्याचे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या रामायणानंतर पक्षश्रेष्ठींना कळवले होते. तेव्हाच थोरातांनी पटोलेंची खारगे आणि राहुल गांधींकडे तक्रारही केली होती. बाळासाहेब थोरात हे स्वतःहोऊनच गटनेतेपदी कायम राहण्यास इच्छूक नसल्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच थोरातांच्या जागी नवीन गटनेत्याची नियुक्तीही केली जाणार असल्याची चर्चा आहे.
पक्षश्रेष्ठींना हवे सगळ्यांना जोडून ठेवणारे नेतृत्व
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देशाच्या राजकारणाचा एकूणच नूर पालटण्याची आशा काँग्रेसला वाटू लागली आहे. अशा स्थितीत प्रदेश काँग्रेसमध्ये हेवेदावे आणि गटबाजी कायम राहिली तर या आशेवर पाणी फेरले जाऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना जोडून ठेवू शकेल आणि सर्वांना सोबत घेऊन एकदिलाने या निवडणुकांना सामोर घेऊन जाऊ शकेल, असेच नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला देण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे. पक्षश्रेष्ठींच्या या कसोट्यांवर यशोमती ठाकूर योग्य ठरत असल्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.