छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बहुचर्चित प्रधानमंत्री घरकुल घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईत आता पुढचे पाऊल टाकले असून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा मुख्य प्रशासक आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना नोटीस बजावली आहे. त्यांना आजच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पांडेय यांनी मात्र या वृत्ताचे खंडण केले आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या घरकुल योजनेतील अनियमिततेबाबत तक्रारी झाल्यानंतर राज्याच्या गृहनिर्माण विभागाने त्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान प्रकल्पासाठी उपलब्ध जागा, प्रस्ताविस्त सदनिकांची संख्या, ज्या कंत्राटदाराला निविदा देण्यात आली त्याची एकूण आर्थिक क्षमता आणि घरकुलासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या दरातील तफावत याबाबींची झाडाझडती घेण्यात आली आणि चौकशीअंती राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
प्रधानमंत्री कार्यालयाने या घरकुल योजना घोटाळ्यातील अनियमितचेची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ईडीने १७ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरातील ९ ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीत काही महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती.
ईडीने छापेमारी केलेल्या ठिकाणांमध्ये काही बिल्डर आणि आकाशवाणी परिसरातील अहिंसानगरातील एका डॉक्टर दाम्पत्याचाही समावेश होता. आता या घोटाळ्याच्या चौकशीत ईडीने पुढचे पाऊल टाकत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि विद्यमान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना नोटीस बजावली असून त्यांना आजच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पांडेय यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यामुळे महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली असून या घोटाळ्यात लवकरच बडेमासे ईडीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेत गंभीर स्वरूपाची अनियमितता झाल्याच्या तक्रारी आहेत. ई निविदा प्रक्रियेतील अटींचा भंग करून सुमारे १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आल्यामुळे प्रधानमंत्री कार्यालयाने हे प्रकरण ईडीकडे सोपवले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलिसात १९ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि विद्यमान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनाच चौकशीसाठी ईडीने बोलावल्यामुळे या घोटाळ्याचा तपास निर्णायक वळणार आल्याचे मानले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून खंडणः एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या या वृत्ताचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मात्र खंडण केले आहे. आपण खासगी कामासाठी मुंबईला आलो असल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.