मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसवून शिवसेनेच्या मदतीने सत्ता टिकवण्याच्या योजनेवर भाजप चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊन त्यांना गळाला लावण्याचा बी प्लान भाजपने तयार ठेवला होता. माध्यमांमधून तशा चर्चाही जोरात सुरू असतानाच शरद पवार यांनी राजीनामा नाट्य घडवून या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे. राज्यातील जनमत अजूनही आपल्या बाजूनेच आहे आणि अजित पवार भाजपच्या गळाला लागले तरी त्यांच्या मागे फारसे लोक जाणार नाहीत, हेच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे नाट्य घडवून दाखवून दिले आहे.
शरद पवारांनी ऐनवेळी मारलेल्या या मास्टरस्ट्रोकमुळे भाजपचा ‘बी प्लान’ अस्तित्वात येण्याआधीच धुळीस मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार यांना गळा लावण्याचा मनसुबा भाजपला सोडून द्यावा लागला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास पुढे काय? याबाबतची चाचपणी भाजपकडून सुरू असून अनेक पर्यायांवर विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरतात. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार आपोआपच कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेताच अपात्र ठरल्यामुळे उर्वरित शिवसेना आमदार राजकीय भवितव्य वाचवण्यासाठी पुन्हा उद्धव ठाकरेंकडेच जाऊन क्षमायाचना करतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राची सत्ता टिकवण्यासाठी आणि नवीन सरकारची मोट बांधण्यासाठी भाजपने नवीन समीकरणांची जुळवाजुळवा सुरू केली आहे.
अजित पवारांना गळाला लावण्याचा भाजपचा रेडी बी प्लान शरद पवारांनी उधळून लावल्यानंतर आता नवीन समीकरणांच्या जुळवाजुळवीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात आणून त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवायचे आणि देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात पाठवणी करायची, या पर्यायावर भाजपकडून विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदार अपात्र ठरले तर सत्ता टिकवण्यासाठीच्या नव्या समीकरणात देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेली टोकाची कटूता लक्षात घेता नितीन गडकरींना महाराष्ट्रात आणून शिवसेनेची मदत घ्यायची आणि सत्ता टिकवायची, अशा पर्यायावर भाजपकडून विचार सुरू आहे.
नितीन गडकरी यांची प्रतिमा मवाळ आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचेही संबंध चांगले आहेत. त्यामुळे विकास, हिंदुत्व आणि सावरकर अशा समान मुद्यांवर शिवसेनेला पुन्हा सोबत घेता येईल का? याची चाचपणी भाजपकडून केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ४० आमदार बाहेर पाडून महाराष्ट्रातून शिवसेनेचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याची देवेंद्र फडणवीस यांची योजना होती. परंतु या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातून प्रचंड सहानुभूती मिळाली आहे. त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला राज्यात मिळणारा प्रतिसाद नगण्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुका शिंदेंना सोबत घेऊन लढवल्यास त्याचा फारसा फायदा होणार नाही, हे भाजपच्या आताच लक्षात आले आहे.
त्यामुळे पुन्हा शिवसेनेशी सूत जुळवण्याशिवाय अन्य दुसरा आणि परिणामकारक पर्याय भाजपला सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे नितीन गडकरींवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तर शिवसेनेशी ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळित करता येतील, असा विश्वास भाजपतील काही नेत्यांना वाटतो. त्यामुळे नितीन गडकरी अस्त्र वापरून महाराष्ट्रातील सत्ता टिकवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असे राजकीय जाणकारांना वाटते.