राष्ट्रवादी काँग्रेस आज काय निर्णय घेणार? सर्वांच्या नजरा शरद पवारांकडे!


मुंबईः शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचीच चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी आज, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? शरद पवारच अध्यक्षपदी कायम राहणार की राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शरद पवार हे त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसवण्याच्या बाजूचे आहेत. मला दोन दिवसांचा वेळ द्या, तुम्हाला नवीन अध्यक्ष मिळेल, असे शरद पवारांनी गुरूवारी सांगितले होते. याच दरम्यान बुधवारी झालेल्या बैठकीत पक्षात कार्याध्यक्ष पद निर्माण करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. परंतु त्यासाठी पक्षाची घटना बदलावी लागणार आणि निवडणूक आयोगाकडे तशी नोंद करावी लागणार होती. या खटापटी टाळण्यासाठी पुन्हा नवीन अध्यक्षावर चर्चा झाली होती.

मंगळवारी ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमातच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर पक्षात भूकंप घडला आणि पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी पवारांवर दबाव टाकला.

या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट सक्रीय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याचे स्वप्न पाहू लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आधी शरद पवारांचे पुतणे अजित पवारांना राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष केले पाहिजे, अशी भूमिका मांडली. नंतर भुजबळांनी या भूमिकेपासून माघार घेतली आणि सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष तर अजित पवारांना प्रदेश अध्यक्षपदी बसवण्याची आग्रही भूमिका मांडली.

याच दरम्यान, सुप्रिया मी मोठा भाऊ म्हणून सांगतो, तू काहीही बोलू नको, असे सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना काहीही न बोलण्याचा सल्ला दिल्ला. परंतु काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले पी.सी. चाको यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनाच अध्यक्ष बनवण्याचा आग्रह धरला. असे केले नाही तर पक्ष विस्कळीत होऊ शकतो, असेही चाको यांनी शरद पवारांना सांगितले.

या सगळा घटनाक्रम वेगाने घडत असतानाच आज शरद पवारांनीच नवीन अध्यक्ष ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीत शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. आज ११ वाजता या समितीची बैठक होत आहे. शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेतला  नाही तर सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंना शरद पवारांच्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आणि अजित पवारांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा मधला मार्ग या बैठकीत काढला जाऊ शकतो.

अजित पवारांच्या हालचाली लक्षात घेता पक्षातील फूट टाळण्यासाठी आणि तख्त पालटण्याच्या प्रयत्नांना मात देण्यासाठी शरद पवारांनी जाणीवपूर्वक राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे पाऊल टाकले, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या हालचालींचा आणि पवारांच्या राजीनाम्याचा काहीएक संबंध नसल्याचे सांगत हा अंदाज फेटाळून लावला आहे.

सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाराच्या किल्ल्या ८२ वर्षीय शरद पवारांकडेच राहतील आणि अध्यक्षपदी पवार नसले तरी पक्षाचे सर्व निर्णय त्यांच्याच सहमतीने घेतले जातील, असे सांगितले जात आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करून या घडामोडींवर चर्चा केली. शरद पवार जर आपला निर्णय मागे घेणार नसतील तर सुप्रिया सुळेंनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे, अशी काँग्रेसचीही इच्छा आहे.

एकीकडे समितीची आज बैठक होत आहे त्यात शरद पवारांचा राजीनामा किंवा नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब यापैकी एका गोष्टीचा निर्णय होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे शरद पवारांनी तेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहतील, असे संकेत दिले आहेत.

गुरूवारी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलताना दोन दिवसांनी तुम्हाला असे आंदोलन करायला बसावे लागणार नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना केल्यामुळे शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांची मनधरणी करण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळेही शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *