बाजार समिती निवडणुकीत मविआ आणि भाजप-शिवसेनेत जोरदार टस्सल, महाविकास आघाडीचीच आघाडी!


मुंबईः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेनेत जोरदार टस्सल पहायला मिळत आहे.  या टस्स्लमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी बाजी मारत बाजार समित्यांवर विजयाचा झेंडा फडकवत आहे.

राज्यातील २५३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी १८ बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित १४७ बाजार समित्यांसाठी मतदान घेण्यात आले. त्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत. काही बाजार समित्यांसाठी येत्या रविवारी मतदान घेण्यात येणार आहे.

कर्जतः अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील ११ पैकी ७ जागा भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलने जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला ४ जागा मिळाल्या आहेत.

अकोलाः अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि भाजपप्रणीत सहकार आघाडी पॅनलची एकहाती सत्ता आली आहे. या बाजार समितीतील सर्व १८ जागांवर सहकार आघाडीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. वंचित बहुजन आघाडी समर्थित पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.

येवलाः येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत १८ जागांपैकी राष्ट्रवादीला १३ जागा मिळाल्या. दोन अपक्षही राष्ट्रवादीच्याच गटाचे आहेत. त्यामुळे १८ पैकी १५ जागा जिंकून भुजबळ यांनी या बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे.

 भोरः पुण्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. आ. संग्राम थोपटे यांच्या राजगड कृषी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत सर्वपक्षीय संघर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. या बाजार समितीच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

तिवसाः सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यतील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वच्या सर्व १८ जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनलने विजय मिळवला. भाजप समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला. या विजयाने यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील आपला दबदबा कायम राखला आहे.

भूमः भूम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने विजयाचा झेंडा फडकवला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या गटाचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने ४ तर महाविकास आघाडीने १ जागा जिंकली आहे.

चंदूर रेल्वेः अमरावती जिल्ह्यातील चंदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसने १८ पैकी १७ जागा जिंकल्या तर भाजपला केवळ एकच जागा मिळाली.

छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत भाजपचे ११ तर महाविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी या बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे.

केजः बीड जिल्ह्यातील केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात आली आहे. या बाजार समितीच्या १८ पैकी १४ जागा मुंदडा-आडसकर गटाने जिंकल्या. ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ पैकी ४ जागा बजरंगबाप्पा सोनवणे यांच्या गटाला मिळाल्या आहेत.

अंबाजोगाईः अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा फडकवला. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला तर भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या.

दिग्रसः  यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्या दिग्रस या गृह मतदारसंघातील पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकल्या. संजय राठोड यांचा शिवसेना शिंदे गट आणि भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीच्या निमित्ताने संजय राठोड यांच्याविरोधात मतदारसंघात असलेली नाराजी समोर आली आहे.

यवतमाळः यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने एकहाती वर्चस्व मिळवले. काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर आणि ठाकरे गटाचे संतोष ढवळे यांच्या गटाने ११ जागा जिंकून बहुतम मिळवले. भाजपला फक्त ४ आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या.

पुसदः पुसद बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वातील मनोहरराव नाईक शेतकरी सहकारी पॅनलने १८ जागा जिंकून या बाजार समितीवरील आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत मनोहरराव नाईक यांचे पुतणे, भाजप आमदार डॉ. निलय नाईक यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले.

महागावः महागावा बाजार समितीत भाजप व शिंदे गटाने १८ पैकी ११ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसेला ५ तर काँग्रेसला दोनच जागांवर समाधान मानावे लागले.

बाभूळगावः बाभूळगाव बाजार समितीत मात्र शिंदे गट व भाजपला चांगलाच हादरा बसला. महाविकास आघाडीने बाभूळगाव बाजार समितीच्या १८ पैकी १४ जागा जिंकल्या. भाजपचे केवळ ४ उमेदवार निवडून आले.

वणीः वणी बाजार समिती निवडणुकीत १४ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. महाविकास आघाडीला केवळ चार जागा मिळाल्या. त्यापैकी तीन जागांवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विजयी झाले.

मावळः पुणे जिल्ह्यातील मावळ बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. १८ पैकी १७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. भाजप व शिंदे गटाला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ आणि काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले.

रामटेकः नागपूर जिल्ह्यातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिन किरपान गटाने १८ पैकी १४ जागा जिंकून काँग्रेस नेते सुनिल केदार आणि शिंदे गटाचे आ. आशीष जयस्वाल युतीचा दारूण पराभव केला. भाजप प्रणित शेतकरी विकास सहकार पॅनलला केवळ ४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत केदार आणि जयस्वाल यांनी युती केली होती.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!