आता खुद्द पवार कुटुंबालाच अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर संशय, १० फेब्रुवारी रोजी होणार ‘रहस्या’चा उलगडा?


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूबाबत आता पवार कुटुंबानेही शंका घेतली आहे. या विमान दुर्घटनेबाबत लोकांच्या मनात अनेक सवाल आहेत आणि पवार कुटुंबालाही संशय आहे, असे अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. १० फेब्रुवारी रोजी मुंबईत आपण त्याबाबतचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या प्रेझेंटेशनमध्ये सर्व शंका स्पष्ट केल्या जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचा बारामतीतील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. या विमान दुर्घटनेनंतर लगेचच पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी या विमान दुर्घटनेबाबत संशय व्यक्त करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. ममता बॅनर्जी यांनी तर अजित पवार हे भाजपची संगत सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार होते, असे माध्यमात वाचले होते. त्यामुळे ही विमान दुर्घटना संदिग्ध वाटते, असे म्हटले होते.

अशात आता या विमान दुर्घटनेवर संशय व्यक्त करणारे वक्तव्य पवार कुटुंबातूनच आले आहे. ही विमान दुर्घटना कशी झाली, याबाबत प्रत्येकाच्याच मनात प्रश्न आणि संशय आहे. विमान वाहतूक तज्ज्ञ आणि वैमानिकांशी (पायलट) चर्चा केल्यानंतर अनेक शंका आहेत. आमच्या पवार कुटुंबातील सदस्यांनाही शंका आहेत. आम्हाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. १० फेब्रुवारी रोजी मी मुंबईत याबाबतचे विस्तृत सादरीकरण करणार आहे. या सादरीकरणात सर्व प्रश्न आणि शंका मांडल्या जातील. आम्हाला उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आहे, असे आ. रोहित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवलेला असू शकतो, अशी शंका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली होती. मात्र रोहित पवारांनी थेट बॉम्बची शक्यता फेटाळून लावली. थेट बॉम्ब असेल असे मला वाटत नाही. परंतु असे अनेक एलिमेंट्स असू शकतात, जे बॉम्बप्रमाणे काम करू शकतात. एखाद्या राजकीय नेत्यानेच हे सारे घडवून आणले किंवा नाही, असे आम्ही म्हणू शकत नाही. परंतु अनेक शंका आणि संशय आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

अनेक नेत्यांकडूनही कळीचे प्रश्न

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनीही या विमान दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. यात काही गैरप्रकार होता का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी विमानातील लोकांच्या संख्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रारंभीच्या रिपोर्टमध्ये विमानात ६ लोक असल्याचे सांगितले गेले. परंतु नंतर ५ लोकांचीच माहिती देण्यात आली. शेवटच्या क्षणी वैमानिक का बदलला गेला? दावा केल्याप्रमाणे विमान दुर्घटनेच्या वेळी खरे धुके होते का? असे अनेक सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या विमान दुर्घटनेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. अजित पवारांकडे भाजपशी संबंधित काही महत्वपूर्ण फाईल्स होत्या का? या विमान दुर्घटनेत काही फाऊल प्ले आहे का? अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का म्हणत आहेत? ते घाबरलेले आहेत का? की तेच  जबाबदार आहेत?, असे थेट सवालच संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

आधी शरद पवारच म्हणाले होते, हा केवळ ‘अपघात’

विशेष म्हणजे या विमान दुर्घटनेनंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी संशय घेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. अब्दुल्ला यांनी तर हा अपघात असल्याचे मान्य करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अजित पवारांचे काका शरद पवार यांनी एक व्हिडीओ जारी करून हा केवळ अपघात असल्याचे सांगितले होते आणि या विमान दुर्घटनेवरील शंका-संशयांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता पवार कुटुंबातूनच या विमान दुर्घटनेबाबत संशय घेतल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी आ. रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनमधून नेमके कोणते रहस्य उलगडणार? याकडे महाराष्ट्रासह सबंध देशाचेच लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!