कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिवांनी कुलुप तोडून ठोकले कोहिनूर महाविद्यालयाला सील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हवालदिल!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची हेकेखोरी आणि मनमानी कारभार सुरूच असून या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (१४ सप्टेंबर) रात्री खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार व अन्य ठिकाणी लावलेली कुलुपे तोडून महाविद्यालयालाच सील ठोकले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आज सकाळी कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाबाहेरच ताटकळत बसले आहेत.

प्राप्त माहितीनुसार कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान या काल रात्री ८ वाजेच्या सुमारास काही जणांना सोबत घेऊन खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात आल्या. आणि महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार, प्राचार्यांचे दालन, स्टाफ रूम इत्यादी ठिकाणी लावण्यात आलेली कुलुपे त्यांनी तोडून टाकली आणि कुलुपे तोडलेल्या ठिकाणी स्वतःच्या स्वाक्षरीने सील ठोकले. सील ठोकताना कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान यांनी सील ठोकल्याची तारीख, वेळ आणि त्यांच्या नावासह हुद्दाही नमूद केला आहे. त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी हे सील ठोकण्यात आले.

हेही वाचाः कोहिनूरच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संस्थाचालकांविरुद्धच एल्गार, प्रशासक नियुक्तीच्या मागणीसाठी उपसले लाक्षणिक उपोषणाचे हत्यार!

नेहमीप्रमाणे आज सकाळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कर्तव्यावर हजर होण्यास महाविद्यालयात गेले असता त्यांना महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलुप तोडून सील ठोकण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेतच ठाण मारून बसले.

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर २०२२ च्या पॅटर्नमध्ये पेपर मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या ऑनलाइन नोंदी घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. त्यासाठी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांनाही बाहेरच ताटकळावे लागले.

हेही वाचाः हाय कोर्टातील अवमान याचिका निकाली निघण्यापूर्वीच कोहिनूर महाविद्यालयातील प्राध्यापकिचे निलंबन, अन्य सात जणांवरही कारवाईचा बडगा

महाविद्यालयाचे कुलुप तोडून सील ठोकण्यात आल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कमरूनिस्सा शेख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

मी विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राचार्य आहे व व्यवस्थापन विद्यापीठाने प्राचार्य पदाची मान्यता काढून घेतलेल्या डॉ. शंकर अंभोरे यांना नियमित प्राचार्य म्हणून कागदोपत्री उल्लेखित करते. डॉ. शंकर अंभोरे यांच्या प्राचार्य पदाच्या मान्यतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत त्यांना प्राचार्यपदाची कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर असलेले आमचे वाद न्यायप्रविष्ट आहेत, असे डॉ. शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचाः वादग्रस्त कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नेमणार, विद्यापीठ पाठवणार राज्य सरकारकडे प्रस्ताव

सद्य स्थितीत संस्थेचे सचिव महाविद्यालयात प्रवेश द्वारा समोर ठाण मांडून आहेत. महिला कर्मचाऱ्यांसाह येथे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी हे महाविद्यालयात उपस्थित आहेत. येथे सुसंवादाचे रूपांतर वादात होऊ शकते व हे संबंधित पदाधिकारी माझ्या अथवा महाविद्यालयाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर खोटा आरोप टाकून आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतात. अथवा व्यवस्थापनाच्या या महाविद्यालय भेटी दरम्यान एखादी अकस्मात अप्रिय अघटीत घटना घडू शकते, असेही डॉ. शेख यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयातील सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश रोखले, डॉ. मझहर खान यांच्या ‘दुकानदारी’ला विद्यापीठ प्रशासनाचा जोरदार झटका!

म्हणे महाविद्यालयाची इमारत संस्थेची मालमत्ता

कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान या महाविद्यालयातच हजर असून त्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दमदाटी करत आहेत. महाविद्यालयाची इमारत ही संस्थेची मालमत्ता आहे, असेही त्या सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान यांनी महाविद्यालयातील काही प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचा परिसर सोडून जावे, त्यांनी महाविद्यालयात येऊ नये, असेही त्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सांगत आहेत. आता या एकूणच प्रकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पहा व्हिडीओ-

हेही वाचाः खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असूनही डॉ. मझहर खानने फोनवरून धमकी देत कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली खंडणीची मागणी

प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव धुळखात पडून

कोहिनूर महाविद्यालयात संस्थाचालकांकडून सुरू असलेली मनमानी, गैरव्यवस्थापन आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची छळवणूक या पार्श्वभूमीवर कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशा ठराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने २६ मे २०२५ रोजी घेतला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा प्रस्ताव विभागीय सहसंचालकांमार्फत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलैंद्र देवळाणकर यांच्याकडे पाठवण्यात आला. परंतु सुमारे सव्वातीन महिने उलटले तरी त्या प्रस्तावाच्या आधारे कोहिनूर महाविद्यालयावर अद्यापही प्रशासकाच्या नियुक्तीची कार्यवाही न झाल्यामुळे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मनमानी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची छळवणूक सुरूच आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!