खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असूनही डॉ. मझहर खानने फोनवरून धमकी देत कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली खंडणीची मागणी


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए. पाठ्यक्रमाच्या परीक्षेत सर्वच्या सर्व पेपर दुसऱ्याकडूनच लिहून घेतल्याप्रकरणी सध्या खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असलेला कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खानने दुसऱ्याच्या फोनवरून कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खुलताबाद पोलिसांकडून डॉ. मझहर खानला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून यासंबंधीची तक्रार तब्बल ५४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांसह राज्यपाल आणि गृहमंत्र्यांकडेही केली आहे.

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए. पाठ्यक्रमाच्या परीक्षेचे सर्वच्या सर्व पेपर बेकायदेशीरपणे दुसऱ्यांकडून लिहून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मझहर खानसह सहा जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात ६ जून रोजी गुन्हा दाखल झाला. खुलताबाद पोलिसांनी डॉ. मझहर खानला मंगळवारी (१७ जून) हर्सूल तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली आणि त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

सध्या डॉ. मझहर खान हा खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस कोठडीत असतानाच डॉ. मझहर खानने आज (१९ जून) कोहिनूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख कमरूनिसा बेगम इक्रमोद्दीन यांना दुसऱ्याच्या मोबाइल फोनवरून कॉल केला आणि धमकी देत खंडणीची मागणी केली.

कोहिनूर महाविद्यालयातील कोणत्याही प्राध्यापकांची स्थाननिश्चिती किंवा पदोन्नती करू नका. कोहिनूर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी माझा काहीही संबंध नाही. मी या संस्थेचा सर्वेसर्वा असून एका मिनिटात हे महाविद्यालय मी बंद करू शकतो, अशी धमकी देऊन डॉ. मझहर खानने भीतीचे वातावरण निर्माण केले असल्याची तक्रार आजच कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, उच्च शिक्षण मंत्र्यांसह सर्व संबंधितांना पाठवण्यात आल्या आहेत.

मझहर खान हा कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असून स्वतः व दुसऱ्याच्या मार्फत माहिती अधिकारात महाविद्यालयाची माहिती मागवून धमकावत आहे व  दहशत निर्माण करत आहे. महाविद्यालयातून सेवा पुस्तिका व इतर महत्वाचे दस्तावेज तो स्वतःकडे ठेवतो, हे पोलिस तपासातूनही समोर आले आहे. मी या संस्थेचा बॉस असून कोणालाही नोकरीवरून काढून टाकू शकतो, अशा प्रकारची भाषा तो सर्व कर्मचाऱ्यांशी वारंवार वापरतो. महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना एका लाईनमध्ये उभे करून वारंवार अर्वाच्च व एकेरी भाषेत शिविगाळ करतो, महाविद्यालयातील कर्मचारी त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत, अशा खोट्या तक्रारी करून शासनाची दिशाभूल करतो, महाविद्यालयात कुठल्याही पदावर नियुक्त नसलेले बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून दहशत पसरवतो. त्यामुळे महिला प्राध्यापिका व विद्यार्थीनींची सुरक्षा धोक्यात आली आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. मझहर खानच्या कुरापतींमुळे कोहिनूर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व प्राचार्य प्रचंड दहशत आणि मानसिक तणावाखाली आहेत.  त्याचा परिणाम अध्यापनासह शैक्षणिक कामकाजावर होत आहे. त्यामुळे डॉ. मझहर खान, संस्थेच्या सचिव आस्मा खान व सहसचिव मकसूद खान या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना महाविद्यालय परिसरात येण्यास मज्जाव करावा आणि संस्थेच्या संदर्भातील त्यांचे अधिकार गोठवण्यात येऊन आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.

‘तो’ फोन कुणाचा?

डॉ. मझहर खान हा खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असताना त्याला वापरण्यासाठी मोबाइल फोन कुणी व का दिला?  मझहर खानला मोबाइल फोन पुरवणारी व्यक्ती बाहेरची आहे की पोलिस ठाण्यातीलच एखादा कर्मचारी आहे? पोलिस कोठडीत असताना मझहर खानला मोबाइल फोनवरून कॉल करून कोहिनूर महावविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकी देत खंडणी मागण्याची ‘खास मुभा’ खुलताबाद पोलिसांनी कशी दिली? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!