आता फक्त QR कोड स्कॅन करून नोंदवा तुमची तक्रार किंवा सूचना, जिल्हाधिकारी कार्यालयाचे डिजिटल पाऊल


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आपल्यावर होणारा अन्याय, कामकाजातील दिरंगाई यासाठी नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता यावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी QR कोड स्कॅन करून नागरिकांना तक्रार किंवा सूचना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता आपल्या मोबाईलमध्ये फक्त QR  कोड स्कॅन करा आणि आपली तक्रार वा सूचना नोंदवा, अशी ही अभिनव संकल्पना असून आजपासून प्रत्येक तहसील व उपविभागीय कार्यालयांत हे QR कोड प्रदर्शित करण्यात आले आहेत. आजपासून जेथे मंडळस्तरावर कार्यालये कार्यरत नव्हती तेथे मंडळ कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत.

नागरिकांना तक्रार व सूचना नोंदवताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व उपविभागीय अधिकारी (एसडीएम) कार्यालयांत तक्रार पेटीशेजारी QR कोड लावण्यात आले आहेत. या QR कोडच्या माध्यमातून नागरिक आता आपली तक्रार किंवा सूचना डिजिटल पद्धतीने थेट नोंदवू शकतील. जिल्ह्यात सध्या १६ ठिकाणी तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार अर्ज देण्याचा त्रास टळेल. प्रवास खर्च वाचेल, तसेच, ज्यांना डिजिटल प्रणालीचा वापर शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच तक्रार किंवा सूचना लिहून पेटीत टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा उपक्रम पारदर्शक, तत्पर आणि उत्तरदायी प्रशासनाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

QR कोड स्कॅन केल्यावर नागरिकांनी आपली प्राथमिक माहिती (नाव, फोन नंबर इत्यादी) भरुन आपली तक्रार वा सूचना टाईप करुन नोंदवावी. ही तक्रार अपलोड केल्यावर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात प्राप्त होईल. ती तक्रार तत्काळ संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल व तक्रारी, सूचनांच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा व आढावा घेण्यात येईल.

या डिजिलट सुविधेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक आता कोणत्याही भीतीशिवाय आपले मत नोंदवू शकतात. हा उपक्रम म्हणजे शासकीय कार्यपद्धतीत नव कल्पना आणून उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन उभे करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!