कुलगुरूंच्या टेबलावर दारूची बाटली, पिस्तूल आणि अश्लील भाषेत शिव्यांचा भडीमार… ‘विद्येच्या माहेरघरी’ धक्कादायक प्रकार


पुणेः विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आणि त्यातही एक प्रतिष्ठित विद्यापीठ अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरूंच्या टेबलावर बसून समोरच्या खुर्चीवर दारूची बाटली, तलवार, पिस्तुल आणि अश्लील भाषेत शिव्यांचा भडिमार करत शूट करण्यात आलेल्या एका रॅप साँगमुळे नवीन वाद उभा राहिला आहे.  या रॅप साँगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारतीला ऐतिहासिक वारसा आहे. या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत जेथे अधिसभा भरते त्या ठिकाणी ज्या खुर्चीवर कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलावर दारूच्या बाटल्या आणि शस्त्र ठेवून अश्लील भाषेत शिव्यांचा भडिमार करत रॅपर शुभम जाधवने एक रॅप साँग शूट केले आहे. विशेष म्हणजे या रॅप साँगसाठी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीच शुभम जाधवला मदत केली.

या रॅप साँगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने माजी पोलिस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिले आहेत.

याप्रकरणी आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या संदर्भात चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आणि विद्यापीठाने एक चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या घटनेची शासनस्तरावरूनही दखल घेण्याची आवश्यकता आहे, असे अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलिस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश शासनस्तरावरूनही देण्यात यावेत आणि भविष्यात कोणत्याही विद्यापीठात अथवा शिक्षण संकुलात असा प्रकार होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी कराव्यात, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!