नाशिकः शहरातील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाजीप्रभू चौकात भाजप कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर अज्ञातांनी आज दिवसाढवळ्या गोळीबार केला. या गोळीबारात भाजपचे पदाधिकारी राकेश कोष्टी जखमी झाले आहेत. महिनाभराच्या अंतराने झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संशयित हल्लेखोरांकडून दोन राऊंड फायर करण्यात आले. त्या काडतूसाच्या केस पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, ती व्यक्ती भाजपच्या कामगार आघाडीचा शहराध्यक्ष आहे. राकेश कोष्टी असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोळीबाराच्या या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अंबड पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कारवाई करत पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव जया दिवे असे आहे. गोळीबार करणारी व्यक्ती सराईत गुन्हेगार आहे. मुख्य हल्लेखोरासोबत असलेल्या साथीदारांचीही पोलिसांनी ओळख पटवली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
आपसातील वादातून गोळीबाराची ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळीबाराच्या या घटनेतील सर्व आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.