संभाजीनगरात भीम जयंतीच्या उत्साहावर महावितरणचे विरजन, लाखोंची गर्दी रस्त्यावर असताना बत्ती गुल


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषात साजरी केली जात असतानाच छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) मात्र या उत्साहावर महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे विरजन पडले. भीम जयंतीच्या मिरवणुकीत लाखोंची गर्दी रस्त्यावर असताना आणि मिरवणूक ऐन भरात असतानाच वीज गुल झाली. त्यामुळे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आंबेडकरी जनतेला महावितरणने अंधारात चाचपडण्याची वेळ आणली.

छत्रपती संभाजीनगरात दरवर्षी प्रचंड जल्लोष आणि उत्साहात भीम जयंती साजरी केली जाते. या मिरवणुकीत लाखोंच्या संख्येने  पुरूष, महिला, तरूण, तरूणींसह अबाल वृद्ध सहभागी होत असतात. महाराष्ट्रात भीम जयंतीला निघणाऱ्या मोठ्या मिरवणुकीपैकी छत्रपती संभाजीनगरातील मिरवणूक एक असते.

मिरवणुकीत सहभागी होणारी लाखोंची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले. मात्र महावितरणचे ढिसाळ नियोजन या मिरवणुकीच्या उत्साहावर पाणी फेरण्यास कारणीभूत ठरले. रात्री दहा वाजेच्या सुमारास शहराच्या बहुतांशी भागातील वीज गुल झाली.

ऐरवी वाऱ्याची छोटीशी झुळूक आली तरी छत्रपती संभाजीनगरातील वीज गुल होते, असा अनुभव आहे. मात्र आज भीम जयंतीनिमित्त लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरते, हे माहीत असूनही महावितरणने फारशी खबरदारी घेतली नाही किंवा तसे नियोजनही केलेले दिसले नाही. परिणामी आज रात्री दहा वाजेच्या सुमारास वाऱ्याची झुळूक येताच वीज गुल झाली. त्यामुळे भीम जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लाखो नागरिकांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली.

वाऱ्याची झुळूक थांबल्यानंतरही रात्री सव्वा आकरा वाजेपर्यंत शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. लाखोंची गर्दी रस्त्यावर असताना अंधाराचे साम्राज्य पसरल्यास काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची थोडीशीही जाण महावितरणने  ठेवली नसल्यामुळे आजचा प्रसंग ओढवल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!