भारतातील सर्वात उंच १२५ फुटी डॉ. आंबेडकर पुतळ्याचे हैदराबादेत अनावरण, अशी आहे पुतळ्याची खासियत…..


हैदराबादः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती देशात उत्साहाने साजरी केली जात असतानाच तेलंगणात आज देशातील सर्वात उंच म्हणजेच तब्बल १२५ फूट उंचीच्या डॉ. आंबेडकर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण समारंभ पार पडला. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.

तेलंगणच्या सचिवालयाच्या शेजारी, गौतम बुद्धाच्या पुतळ्याच्या समोर आणि तेलंगण हुतात्मा स्मारकाजवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा लोकांना दररोज प्रेरणा देत राहील आणि संपूर्ण राज्य प्रशासनाला प्रेरित करित राहील, असे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.

के. चंद्रशेखर राव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा तेलंगणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर तांत्रिक आणि पुतळा निर्मितीचे काम अंतिम करण्यासाठी दोन वर्षे लागली.

या पुतळ्याच्या उभारणीसाठी १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ११.४ एकर विस्तीर्ण परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला आहे. भारताच्या संसदेसारखीच दिसणारी एक गोलाकार इमारत उभारून त्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीत एक संग्रहालय, एक ग्रंथालय आणि एक दृकश्राव्य हॉल उभारण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या जीवनकार्याचा सर्वंकष परिचय यातून करून देण्याचा प्रयत्न आहे.

२०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारकाची कोनशीला बसवण्यात आली होती. परंतु १४ एप्रिल २०२१ पासून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा देशातील सर्वात उंच पुतळा ब्रान्झमध्ये तयार करण्यात आला आहे.

 पुतळ्याची एकूण उंची १७५ फूटः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ पुतळा १२५ फूट उंचीचा आहे. तर ज्या संसदेसारख्या चबुतऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे, त्याची उंची ५० फूट आहे. त्यामुळे संसदेसारखा दिसणारा चबुतरा आणि मूळ पुतळ्याची उंची एकत्रित केल्यास प्रत्यक्षात हा पुतळा १७५ फूट उंचीचा होतो. तेलंगण सरकारने नवीन सचिवालय बांधले असून या सचिवालयालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव दिले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!