मुंबई: मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सोमवारी दिली.
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत सौनिक बोलत होत्या. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आणि अधिकारी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी लवकरच टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठवण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, असे सौनिक म्हणाल्या.
मंत्रालयात फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी कार्यालयीन वेळेत मंत्रालयाच्या मध्यवर्ती टपाल केंद्रात टपाल स्वीकृतीसाठी विभाग व कार्यालय निहाय व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठवण्यात येईल, याकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात येणार आहे.
नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठवण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल समक्ष स्विकारले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आपले सरकार वेबपोर्टल होणार लोकाभिमुखः
‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून ५११ सेवा पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये १२४ सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल ॲप देखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.