सिल्लोड तालुक्यात शाहीर पठाडेंच्या नेतृत्वात लोकरंजनातून शासकीय योजनांबाबत लोकप्रबोधन!


छत्रपती संभाजीनगर:  लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालय व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शाहीर डॉ. शेषराव पठाडे आणि सहकाऱ्यांनी वरखेडी, बनकिन्होळा, निल्लोड, कायगाव, पिंपळगाव (पेठ), वरूड-पिंपरी, टाकळी जिवरग या सात गावांत गण, गौळण, रंगबाजी आणि लोकगीतांतून योजनांचा जागर केला. सातही गावांत कलारसिकांकडून चांगले सहकार्य मिळाले.

मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांसह तृतीयपंथीयांना सन्मानाजनक वागणूक आदींबाबत हलक्या-फुलक्या विनोदांसह अस्सल ग्रामीण ढंगात नाट्य-संवाद, लोकगीतांद्वारे लोकरंजनातून लोकप्रबोधन केले.

शाहीर पठाडे यांच्यासह सूत्रधार के. एस. नवतुरे, साथीदार अमोल खंडागळे व गोपाल भालेराव यांनी कार्यक्रमांत रंग भरले. ढोलकीवर ज्येष्ठ कलावंत अभिमान मिसाळ, तर पेटीवर सुप्रसिद्ध गायिका रेखा भारती यांनी दमदार साथसंगत केली. गावागावांत आबालवृद्धांकडून कार्यक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळाला. गावोगावचे सरंपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी कलापथकातील कलावंतांचा यथोचित मान-सन्मान करून कार्यक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!